सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्याच्या हद्दीतील रस्त्याची गुणवत्ता, वाहनचालकांना पुरविण्यात येणा-या सुविधा बघून मगच टोल आकारणी व्हावी, अशी साद सोशल मीडियावर दिली गेली. त्यावर तब्बल दहा हजार लोकं व्यक्त झाले. त्यात ‘टोलचा झोल मिटवा आणि सातारकरांना वाचवा,’ अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
सातारा मतदारसंघात सध्या राजकीय घमासान सुरू आहे. लोकसभेची पोटनिवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीतच दोन दिवसांपूर्वी टोलमुक्तीबाबत समाजमाध्यमांवर एक पोस्ट करण्यात आली. या पोस्टला सातारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. टोलमुक्तीसाठी आक्रमक भूमिका सोशल मीडियावर मांडली जात आहे. रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असताना नागरिकांनी टोल का म्हणून द्यायचा, असा संतप्त सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे. टोलनाक्याची गरज, उपलब्ध सोयी, यापासून टोल नाक्यापासून मिळणारे उत्पन्न, तो कोणाचा, त्याचा मलिदा कोण लाटतं? इथंपर्यंतच्या चर्चा सध्या सुरू आहेत.
टोलमुक्ती नावाने सोशल मीडियावर तयार करण्यात आलेल्या पेजवर सुमारे दहा हजार लोकांनी आपली परखड मते व्यक्त केली आहेत. काहींनी आंदोलनाचा तर कोणी निवडणूक प्रचार सभांमध्ये निषेध नोंदविण्याचेही सल्ले दिले आहेत.पैसे भरू.. गुणवत्ता हवीसातारकरांनी कधीही टोलला विरोध केला नव्हता. रस्त्याची गुणवत्ता ढासळल्याने होणाºया अपघातांची संख्या वाढतेय, अशा स्थितीत ‘जसे रस्ते तसे टोलचे पैसे’ ही लोकभावना असल्याचे रवींद्र नलवडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.