सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होऊ लागला आहे. एकीकडे कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे मृत्यूचे तांडवही सुरू झाले आहे. जिल्ह्यात दि. १ ते १२ एप्रिल या कालावधीत तब्बल ८ हजार ८०० नवे रुग्ण आढळून आले असून, ७९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बाधितांचा हा गेल्या सात महिन्यांतील सर्वात मोठा उच्चांक आहे.
एप्रिल महिना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा अक्षरश: उद्रेक सुरू झाला आहे. दररोज ७०० ते ९०० रुग्ण आढळून येऊ लागल्याने चिंतेत भर पडू लागली आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत आहे. या प्रयत्नांना काही अंशी यशही येत आहे; परंतु कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी ती वाढत चालल्याने चिंतेचे ढग अधिकच गडद होऊ लागले आहेत.
सातारा जिल्ह्यात दि. १ ते १२ एप्रिल या कालावधीत तब्बल ८ हजार ८०० रुग्ण आढळून आले आहेत. तर ७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केवळ १२ दिवसांत जवळपास नऊ हजार रुग्ण आढळून आल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये कोरोनाने थैमान घातले असले तरी सद्यस्थितीत सातारा, फलटण व कऱ्हाड तालुक्यात रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. शहरी व ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाल्याने सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रातही वाढ होऊ लागली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आता नागरिकांनी शासन नियमांचे पालन करणे गरजेचे बनले आहे. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही.
(चौकट)
याची आहे गरज
१. सातारा पालिकेने गतवर्षी १४ कर्मचाऱ्यांचे एक अशी २२ पथके तयार केली होती.
२. या पथकांनी रोज नऊ ते दहा तास काम करून शहरातील २७ हजार ५०० कुटुंबांचा सर्व्हे केला होता
३. यामध्ये केवळ पुणे-मुंबई येथून आलेल्यांचीच नोंद नव्हती तर प्रत्येक कुटुंबाच्या प्रमुखासह, सदस्यांचा तपशील त्यांची वैद्यकीय माहिती, प्रवास, चालू असलेले उपचार त्याचा तपशील इत्यादी नोंदी घेण्यात आल्या होत्या.
४. सध्या कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता पालिका प्रशासनाने पुन्हा एकदा सर्व्हेचे काम हाती घेणे गरजेचे बनले आहे.
५. ज्या भागात, पेठेत रुग्ण संख्या अधिक आहे तेथे कोरोना चाचणीचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे.
६. नागरिकांनी देखील परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी शासन नियमांचे पालन करायला हवे.
(चौकट)
सातारा @ ५९१४
जिल्ह्यासह सातारा शहरातही कोरोनाने थैमान घातले आहे. पालिका प्रशासन व आरोग्य विभागाकडून गेल्या वीस दिवसांत सुमारे ६० हजार नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यामध्ये तब्बल ५ हजार ९१४ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती पालिकेच्या कोरोना विभागाकडून देण्यात आली. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरातील सर्व व्यापारी, दुकानदार, विक्रेते, हातगाडीधारकांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे सातारा शहरासह तालुक्यात बाधितांची संख्या वाढू लागली असून सातारा तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट ठरू लागला आहे.
(चौकट)
शहरात ९२ प्रतिबंधित क्षेत्र
सातारा शहरातील सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रातही वाढ होऊ लागली आहे. सध्या शहर व परिसरात प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या ९२ इतकी झाली आहे. पालिकेकडून प्रतिबंधित क्षेत्र बांबू व बॅरिकेटिंकद्वारे सील केली जात आहेत. या ठिकाणी निर्जंतुकीकरण मोहीम राबविली जात असून, पालिकेने या कामी विशेष पथक नेमले आहे.
(गेल्या बारा दिवसांतील कोरोना स्थिती)
दि. बाधित मृत्यू
१. ५३२ ४
२. ७४२ ०
३. ७०३ २
४. ४९८ ६
५. ७५८ ६
६. ५१५ ७
७. ९२२ ५
८. ६५९ ९
९. ७१६ ८
१०. ८८५ ११
११. ८५४ ७
१२. १०१६ १४
एकूण ८८०० ७९