खंडाळा : खंडाळा तालुक्यासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढ झपाट्याने होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शेकडो जणांचे जीव जात असताना सामान्य जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाहीत. अशा परिस्थितीत प्रशासनाने शिरवळ येथील हॉस्पिटल डीसीएचसी अंतर्गत घेऊन ऑक्सिजनयुक्त बेडच्या सर्व सुविधा जनतेसाठी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी केली.
खंडाळा तालुक्यात कोरोना रुग्णांची होणारी वाढ लक्षात घेता अनेकांना बेड उपलब्ध होत नाहीत; मात्र जगताप हॉस्पिटल येथे ५४ ऑक्सिजन बेडची सुविधा असताना त्याचा उपयोग तालुक्यातील सामान्य नागरिकांना होत नाही. प्रशासन याकडे गंभीरतेने पाहात नाही, असा आरोप करीत सुविधा नसल्याने गोरगरीब कोरोना बाधित रुग्णांना खासगी रुग्णालयांत भरती व्हावे लागत आहे. जगताप हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनयुक्त बेड असतानाही तेथे फक्त कोरोना लक्षणे न दिसणारे रुग्णच दाखल केले जातात.
यावेळी जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांच्यासोबत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. एस. वाय. पवार, अतुल पवार, प्रकाश गाढवे, हर्षवर्धन भोसले, रत्नकांत भोसले उपस्थित होते.