राजीव मुळ्ये ल्ल सातारा लोकसंख्या वाढली, वाहनं वाढली; पण रस्ते तेवढेच राहिल्याने रस्त्यांचा श्वास घुसमटला. यातच आणखी एक विचित्र अडथळा शहराच्या अनेक भागांमध्ये सामोरा येत आहे. विजेचे आणि दूरध्वनीचे अनेक खांब रस्त्यांच्या मध्येच उभे आहेत. गंमत म्हणजे या खांबांच्या दोन्ही बाजूंनी डांबरीकरण झाले आहे; पण खांब काढण्याची, अन्यत्र हलविण्याची प्रक्रिया अनेक ठिकाणी रखडल्यामुळे दिसणारे विनोदी दृश्य बऱ्याच वेळा धोकादायक ठरत आहे. शहरात एकेरी वाहतूक सुरू झाल्यानंतर मुख्य दोन रस्त्यांचे जोडरस्ते अधिक प्रमाणात उपयोगात आले. रविवार पेठेतील लोणार गल्ली हा त्यापैकी एक रस्ता होय. या रस्त्याचे डांबरीकरण झाले; परंतु जुन्या खांबांनी आपली जागा सोडली नाही. परिणामी, वाढत्या रहदारीचा त्रास टाळण्यासाठी दुचाक्या खांबांच्या मागून सुसाट धावू लागल्या आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागले. या पेठेतील नागरिकांनी खांब हलविण्याची मागणी बरीच लावून धरली. ती नुकतीच पूर्ण झाली आणि या पेठेतील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. रस्त्यातील खांब काढल्याने वाहतुकीला अधिक रुंद रस्ता उपलब्ध झाला, हा दुसरा फायदा! परंतु, स्थानिकांनी मागणी केली तरच खांब काढायचे, असा जणू नियम असल्याप्रमाणे शहराच्या अन्य भागांत रस्त्यात येणारे खांब अजून जसेच्या तसे ठेवण्यात आले आहेत. गोडोली, सदर बझार, शाहूपुरीकडे जाणारा रस्ता आदी ठिकाणी खांबांची समस्या दिवसेंदिवस धोका वाढविते आहे आणि या धोक्याकडे कोणाचेच लक्ष नाही. विशेषत: कोटेश्वर मैदानाकडून अर्कशाळेसमोरून शाहूपुरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर जुने खांब अशा ठिकाणी आहेत, की ते जर आणखी थोडे मध्ये असते, तर त्यांनी दुभाजकाची भूमिका पार पाडली असती. या रस्त्यावर काही महिन्यांपूर्वी भीषण अपघातात एक बळीही गेला आहे. खांबांच्या अलीकडून वाहने येणार नाहीत, असे समजून पादचारी चाललेले असतात; पण दुचाक्या त्यांचा अपेक्षाभंग करीत अचानक समोरून किंवा मागून येतात. शिवाय, मोठ्या वाहनांना ओलांडून पुढे जाताना खांबांच्या पलीकडील भागाचा वापर दुचाकीचालकांकडून केला जातो. नवखा चालक असल्यास अचानक दिसणाऱ्या खांबामुळे नियंत्रण सुटून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. काही मुख्य रस्ते आणि असंख्य गल्लीबोळांत खांब रस्त्याच्या मधोमध आहे. नव्याने गल्लीत प्रवेश करणाऱ्या चालकाला, विशेषत: रात्रीच्या वेळी अचानक खांब समोर दिसल्यास काय करावे हे कळत नाही. पादचाऱ्यांनाही अंधारात बऱ्याच वेळा खांब दिसत नाही. या खांबांवर किमान रेडियमच्या पट्ट्या तरी एव्हाना लागायला हव्या होत्या. परंतु, तेही झाले नसल्याने अनर्थ ओढावण्याची वाट पाहिली जात आहे की काय, असा प्रश्न निर्माण होतो. सदर बझारमधील अनेक रस्त्यांवर ही समस्या आ वासून उभी आहे. गोडोलीत अशीच स्थिती काही रस्त्यांवर आहे. शेटे चौकातून उत्तरेकडे जाणाऱ्या उताराच्या अरुंद रस्त्यावर अशाच प्रकारे खांब मधोमध उभा आहे. या रस्त्यावर दुचाकी वाहने आणि रिक्षांना येण्या-जाण्यास अडथळा होत असून, रात्री-अपरात्री खांब न दिसल्यास अपघात संभवतो शहरात जे रस्ते नव्याने झाले, त्यावरील खांब हलविण्यासाठी जवळपास ५० लाख रुपये पालिकेने वीज वितरण कंपनीकडे भरले. हे खांब उभे करताना पालिकेला विचारले गेले नाही; पण हलविताना मात्र पालिकेने पैसे भरायचे, हा नियम! रस्त्यांच्या बजेटमधून केवळ खांब दूर करण्यासाठी पालिका किती रक्कम भरू शकणार? याविषयी वीज कंपनीनेही सहकार्याचे धोरण ठेवले पाहिजे. अखेर तीही नागरिकांना सेवा पुरविणारी संस्था आहे. - अभिजित बापट, मुख्याधिकारी, सातारा पालिका
यमदूत दडलेत खांबाआड!
By admin | Published: July 10, 2014 12:31 AM