सातारा : मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला साता-याची बाजारपेठ नागरिकांनी गजबजून गेली. तीळगूळ, सुगड, वाण म्हणून वाटप केले जाणा-या विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांची अक्षरश: झुंबड उडाल्याचे पाहावयास मिळाले.
संक्रांत हा जानेवारी महिन्यात आणि हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येणारा एक महत्त्वपूर्ण सण. या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून याला मकरसंक्रांत म्हणतात. संक्रांतीची चाहूल लागल्यापासून बाजारपेठ विविध प्रकारच्या वस्तूंनी सजून गेली होती. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांची खरेदीसाठी रेलचेल सुरू होती.
महिलांकडून एकमेकींना वाण म्हणून विविध प्रकारच्या वस्तू दिल्या जातात. यंदा प्लास्टिकच्या वस्तू विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल झाल्या असल्या, तरी महिलांनी अशा वस्तूंच्या खरेदीकडे पाठ फिरविली. प्लास्टिकची वस्तू वाण म्हणून देण्यापेक्षा साखर, फळे, शाम्पू, बिस्कीट, काचेची बरणी आदी संसारोपयोगी वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री झाली. याशिवाय सुगड, हळदी-कुंकू, ओवशाचे साहित्य, विविध प्रकारचे तीळगूळ आदींचीदेखील मोठ्या प्रमाणात विक्री झाली.
फोटो : १३ जावेद