सातारा : नियमीत पीक कर्जफेडमधील राहिलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ देण्याची घोषणा कृषीमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनात करुन महिना उलटून गेला तरीही लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. सातारा जिल्ह्यातील अशा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या तर २० हजारांवर आहे. त्यामुळे कृषीमंत्र्यांची घोषणा वाऱ्यावर, ‘प्रोत्साहन’ नाही खात्यावर अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे.राज्यात पावणे चार वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले होते. त्यावेळी नियमित कर्जफेड आणि दोन लाखांवर पीक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही मदतीची घोषणा केली होती. या योजनेला महात्मा फुले कर्जमाफी योजना असे नाव देण्यात आले होते. सुरुवातीच्या टप्प्यात दोन लाखांपर्यंत थकित कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला. यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करुन प्रमाणिकरण केले. नंतरच रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली. त्यातच सत्ता बदलानंतर आताच्या राज्य शासनाने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यास सुरुवात केली आहे.जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील यादी गेल्यावर्षी दिवाळीच्या अगोदर जाहीर झाली होती. तर दुसरी यादी गेल्यावर्षीच डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केली. ही यादी सर्वांत मोठी होती. आतापर्यंत १ लाख ९५ हजार ७९४ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहन लाभाची रक्कम जमा झालेली आहे. असे असलेतरी अजुनही जिल्ह्यातील २० हजारहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. त्यामुळे त्यांचे बॅंकेतील हेलपाटे सुरूच आहेत. लाभ कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.
कृषीमंत्र्यांची घोषणा वाऱ्यावर; ‘प्रोत्साहन’ नाही खात्यावर; सातारा जिल्ह्यातील 'इतके' शेतकरी प्रतीक्षेत
By नितीन काळेल | Published: September 15, 2023 6:40 PM