लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जुलै महिन्यात आलेल्या पावसाने पाटण तालुक्यातील गावांना चांगलाच तडाखा दिला. घरे दरडीखाली गाडली गेली आणि जमीन गाळाने पिळवटून गेली. याला दोन महिने उलटून गेल्यानंतर अद्यापही या भागातील स्थानिकांना गढूळ पाणी प्यावं लागतंय. निवारा केंद्रात आसरा घेणाऱ्या अनेकांना अद्यापही हक्काचे घर मिळाले नाही. कागदावर सक्षम असणारे आपत्ती व्यवस्थापन विभाग आपत्तीग्रस्त झाले असून, याचा फटका येथील स्थानिकांना सोसावा लागत आहे.
पाटण तालुक्यात २२ आणि २३ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीने कोयना नगर विभागातील पुरामुळे व भूस्खलनामुळे बाधित झालेल्या कामरगाव, हुंबरळी, तोरणे, ढोकावळे, हेळवाक, कोयना नगर, रासाटी, दास्तान, गोषटवाडी, शिरळ, त्रिपुडी, म्हावशी आणि नावडी या गावांना अजूनही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. भूस्खलनामुळे सर्वस्व गमावलेल्या या गावात अद्यापही आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध न झाल्याने स्थानिकांचे हाल होऊ लागले आहेत. भूस्खलनात संपूर्ण घरच वाहून गेल्याने यातील बहुतांश कुटुंबांना अजूनही शाळेतच राहण्याची वेळी आली आहे. लोकांकडून आलेले साहित्य पुरवून प्रशासन आपल्या कर्तव्यपूर्तीच्या फुशारक्या मारतंय; मात्र दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला तरी या लोकांना स्वच्छ पाणी प्यायला मिळत नाही, हे दुर्दैव आहे.
गत सप्ताहात या भागातील काहींनी शासनाच्या विरोधात आंदोलनही केले; पण शासकीय उत्तरांच्या पलिकडे त्यांना काहीच मिळाले नाही. शासकीय पदांवर कार्यरत असणाऱ्या यंत्रणेतील या अधिकाऱ्यांनी खुर्चीतील बाज सोडून सामान्यांच्या जागी जाऊन परिस्थितीचे अवलोकन केले, तरच ही स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. सामान्यांनी आपल्यातील अर्धी भाकरी देऊन या बांधवांना शक्य ते सहकार्य केले. आता राज्यकर्त्यांनी प्रशासकीय यंत्रणेच्या मागे लागून भूस्खलनग्रस्तांची योग्य सोय लावण्यासाठी प्रयत्नशील रहावे, अन्यथा आगामी काळात राजकीय चित्रही बदलेल, यात शंका नाही.