सातारा : सातारा लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर नसलातरी पदाधिकारी मात्र एक झाले आहेत. यासाठी राष्ट्रवादी भवनमध्ये बैठक घेऊन सविस्तर चर्चाही करण्यात आली. त्यानुसार दि. २६ पासून विधानसभा मतदारसंघात एकत्रित प्रचार करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.सातारा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीचा शरद पवार गट लढणार आहे. तर महायुतीत भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात तिडा आहे. महायुतीचा उमेदवार ठरत नाही तोपर्यंत शरद पवार हेही आपला उमेदवार जाहीर करणार नाहीत, असेच चित्र सध्या आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी एकसंध असल्याचे दिसून आलेले आहे.यासाठी आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या दोन बैठकाही साताऱ्यात पार पडल्या. पहिली बैठक राष्ट्रवादी भवनमध्ये झाली. त्यानंतर मागील १५ दिवसांपूर्वी काॅंग्रेस कमिटीत माजी मुख्यमंत्री पृश्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. त्यामुळे आघाडीने उमेदवार कोणीही असो आम्ही एकसंध आहोत, असाच संदेश यामधून दिलेला. याच पार्श्वभूमीवर नुकतीच राष्ट्रवादी भवनमध्ये आघाडीची बैठक पार पडली.
राष्ट्रवादी भवनमधील या बैठकीला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, राजेंद्र शेलार, राजकुमार पाटील, नरेश देसाई यांच्यासह इंडिया आघाडीतील अॅड. वर्षा देशपांडे, विजय मांडके, मकरंद बोडके, मिनाज सय्यद, अॅड. रवींद्र पवार, शरद जांभळे, स्वप्नील वाघमारे, प्राची ताकतोडे, काॅ. अस्लम तडसरकर आदी उपस्थित होते. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली.या बैठकीत सातारा जिल्ह्याला दिवंगत यशवंतराव चव्हाण, देशभक्त किसन वीर आबा, बाळासाहेब देसाई यांच्या विचारांचा वारसा लाभला आहे. त्यामुळे या निवडणुकीत आघाडीचा उमेदवार कोणी का असेना त्याच्या पाठीशी एकी ठेऊन ठामपणे उभे राहण्याचा निर्धार करण्यात आला. यासाठी एकत्रित बैठका, सभा घेण्याचेही ठरविण्यात आले. त्यामुळे महाविकास आघाडीकडून निवडणुकीची पूर्ण तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे.
इंडिया आघाडीतील पदाधिकाऱ्यांचा दाैरा असा..इंडिया आघाडीतील पदाधिकारी २६ मार्चपासून सातारा लोकसभा मतदारसंघात बैठका घेणार आहेत. या बैठका विधानसभा मतदारसंघनिहाय असणार आहेत. यामध्ये दि. २६ ला पाटण आणि कऱ्हाडला बैठक होणार आहे. तर २७ मार्चला कोरेगाव, २८ जावळी तालुक्यात मेढा येथे आणि साताऱ्यात बैठक होईल. २९ मार्चला वाई, खंडाळा आणि महाबळेश्वरची बैठक होणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.