प्रगती जाधव-पाटील
सातारा : रुग्ण मग तो कोणीही असला तरी त्याच्यावर वेळेत योग्य उपचार झाले पाहिजेत हे वैद्यकीय तज्ञांना शिकविले जाते. मात्र, सातारा जंबो कोविड सेंटरमध्ये काही उलटे प्रकार निदर्शनास येत आहेत. मृत्यूच्या दारात उभे असलेले सामान्य रुग्णवाहिकेत ऑक्सिजन लाऊन ‘मेरा नंबर कब आऐगा’ म्हणत असताना नेत्यांच्या वशिल्यामुळे थेट आत जात आहेत. ज्यांना नेत्यांचा वशिला लावणं शक्य आहे, त्यांना मोफत उपचार कशाला पाहिजेत, असा सवाल आता रुग्णांचे नातेवाईक करू लागले आहेत.
सातारा जंबो कोविड सेंटरमध्ये जिल्ह्यासह बाहेरुनही रूग्ण दाखल होत आहेत. अत्यावस्थ अवस्थेत असलेल्या रुग्णांसह येथे दिवसभरात पन्नासहून अधिक जण दाखल होतात. एक रुग्ण सोडल्यानंतर दुसऱ्याला आत घेण्याची सिस्टीम त्यांनी बसवली आहे. मात्र, रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर येथे ताण येऊ लागला. मोफत औषधोपचार सुरू असलेल्या सेंटरच्या बाहेर रुग्णवाहिकेत १३ ते १५ रुग्ण वेटिंगवर असतात. यातील काही जण खासगीत उपचार घेण्यासाठी जातात, तर काहींना नाईलाजाने येथेच थांबावे लागते. अत्यावस्थ असलेल्या रुग्णाला रुग्णवाहिकेत ठेऊन त्यांना वाट बघायला लावली जात असतानाच दुसरीकडे मात्र तुलनेने बरे रूग्ण निव्वळ कोणाच्या फोनवर किंवा मलिद्यावर आत सोडलं जाणं गैर आहे.
कोरोनाचा विस्फोट लक्षात घेता तातडीने उपचारांची गरज असणाऱ्या रुग्णांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. ज्यांना घरी विलगीकरणात राहणं शक्य आहे, त्यांनी घरून उपचार घ्यावेत आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती आहे, त्यांनी खाजगीत उपचारांसाठी जाऊन सामान्यांसाठी जंबो सेंटर राखीव ठेवावं, असं अपेक्षित आहे पण महागड्या गाड्यांमधून उतरून फुकट सेवा उपभोगणारे वाढू लागल्याने त्याचा पुन्हा फटका सर्वसामान्यांनाच बसत आहे.
चौकट :
... तर मतदार संघात उभं करा सेंटर!
अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या रुग्णाला जवळ असलेल्या ठिकाणी आणि तातडीने उपचार करण्यासाठी प्राधान्य द्यावं ही समाजाची मानसिकता आहे. मात्र, काही नेते मंडळींकडून काहीही झालं तरी बेड मिळाला पाहिजे, अशा भाषेत अधिकाऱ्यांना सुनावले जाते. परिणामी सेंटरच्या बाहेर रुग्णाला गाडीत बसवून स्वत: अख्खी रात्र व्हरांड्यात काढणाऱ्यांपेक्षा वशिल्याने येणाऱ्यांना बेड दिले जातायत. कोणत्याही लोकप्रतिनिधीला स्वत:च्या मतदारांची इतकी चिंता असेल तर त्यांनी त्यांच्या मतदारसंघात सेंटर उभं करून त्यांची सेवा करावी. गत सप्ताहात राज्यातील ‘दबंग’ दादांचा फोन आल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात तब्बल १२ रुग्णांची सोय करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
राखीववर जमलं तर ठीक नाही तर चिरीमिरी झिंदाबाद
साताऱ्याच्या जंबो कोविड सेंटरमध्ये जिल्ह्याच्या विविध भागांतून येणारे रुग्ण आहेत. या रुग्णांना नंबर लावून मगच आत घेतले जाते. त्यातील काही बेडस विशिष्ट तालुक्यांसाठी राखून ठेवले गेले आहेत. जंबो सेंटरमध्ये मात्र रिसेप्शनपासून आत जाण्यासाठी दिव्य पार करावे लागते. तालुक्याचा कोटा नसेल तर वशिला आणि तेही नसेल तर रुग्णांच्या नातेवाईकांना येथील काहींचे हात ओले करावे लागतात. एक रुग्ण दाखल करण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केल्याचीही चर्चा येथे दबक्या आवाजात आहे.
कोट :
सातारा जंबो कोविड सेंटरमध्ये गरजूंना औषधोपचार मिळावेत ही आमची भूमिका आहे. पण कोणा नेत्याचा वशिला लावून चालत जाणाऱ्या पेशंटपेक्षा रुग्णवाहिकेत ऑक्सिजन मशीन लावून रांगेत उभे असणाऱ्याला प्राधान्याने उपचार मिळणं आवश्यक आहे. आरोग्यसेवा देताना होणारा हा भेदभाव संतापजनक आणि रुग्णासह त्यांच्या नातेवाईकांचे खच्चीकरण करणारा आहे.
- विनीत पाटील, सातारा कोविड डिफेंडर ग्रुप