म्हसवड : सध्या कोरोनामुळे शाळा बंद आहेत. अशा वेळी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी ऑनलाइन शिक्षणासह इतर मार्गांचा वापर करून, माण तालुक्यातील शिक्षक ज्ञानदान करत आहेत. शिक्षकांचे हे काम आदर्शवत असून, त्यामुळे गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे यांनी केले.
प्राथमिक शिक्षक सहकारी बँक शाखा दहिवडी व माण तालुका प्राथमिक शिक्षक संघ परिवाराच्या वतीने आयोजित माण तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या सत्कार प्रसंगी गोरे बोलत होते. यावेळी माजी शिक्षण सभापती भास्करराव गुंडगे, शिक्षक बँकेचे व्हा.चेअरमन महेंद्र अवघडे उपस्थित होते.
यावेळी बोलताना भास्करराव गुंडगे म्हणाले, जिल्हा परिषद शाळांचा दर्जा चांगला असून, शिक्षक प्रामाणिकपणे योगदान देत आहेत. विद्यार्थ्यांच्या मानसिक, बौद्धिक, तसेच शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात यावेत.
यावेळी सुजाता कुंभार, वसंत जगदाळे, संजय खरात, वैशाली खाडे, सतेश माळवे यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.
सुगंधराव जगदाळे, अरुण गोसावी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन रामभाऊ खाडे, प्रास्ताविक हरीश गोरे यांनी, तर माने यांनी आभार मानले.
यावेळी मोहनराव जाधव, लालासाहेब ढवाण, सूरज तुपे, राजाराम पिसाळ, हणमंत अवघडे, महेंद्र कुंभार, यादवराव शिलवंत, शशिकांत खाडे, दत्ता खाडे, दत्तात्रय वाघमारे यासह शिक्षक कार्यकर्ते उपस्थित होते.