प्रगती जाधव-पाटील ।सातारा : न्याय व्यवस्था टिकविण्याबरोबरच कोणावरही अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेत शेकडो केसेस जिल्हा न्यायालयात हाताळल्या जातात. त्याच न्यायालयाच्या बार रूममध्ये केशरचनांची अनोखी स्पर्धा पार पडली. न्याय निवाड्याच्या केसेस हाताळणा-या हातांनी केशरचनेतही आपली सरशी असल्याचे दाखवून दिले.
सातारा जिल्हा बार असोसिएशनच्यावतीने दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदा मात्र यात केशरचना स्पर्धांचा समावेश करण्यात आला. न्यायालयीन कामकाज संपल्यानंतर दिलेल्या निर्धारित वेळेत केशरचना करणं बंधनकारक होतं. केशरचना करताना कोणत्याही वस्तूंचा वापर टाळण्याचा नियमही या स्पर्धेत घालण्यात आला होता. त्यामुळे ही स्पर्धा थोडी क्लिष्ट होती. पण तरीही स्पर्धकांनी आपल्यातील उत्तम कलांचे प्रदर्शन दर्शवत उत्तम केशरचना सादर केल्या.
पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या केशरचना या स्पर्धेत तब्बल दहा जणींनी सहभाग नोंदविला. यात अॅड. वंदना संकपाळ, अॅड. प्रीतम महांगडे, अॅड. वैशाली निकम साळुंखे, अॅड. सुचेता कोकीळ, अॅड. सोनाली तोडकर, अॅड. मनीषा पवार, अॅड. स्वाती जगताप, अॅड. अपर्णा मुके, अॅड. वृषाली गाढवे यांचा समावेश आहे. परीक्षक म्हणून सौंदर्यतज्ज्ञ डॉ. मृणालिनी कोळेकर यांनी काम पाहिले.
स्पर्धेत अॅड. प्रीतम महांगडे प्रथम, अॅड. वैशाली निकम-साळुंखे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सातारा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अरुण खोत, उपाध्यक्ष अॅड. संग्राम मुंढेकर, सचिव अॅड. अभिजित घोरपडे, सहसचिव अॅड. राजश्री सावंत, खजिनदार अॅड. अभिजित यादव, अॅड. महेश कुलकर्णी यांनी विशेष प्रयत्न केले. अॅड. राजश्री सावंत आणि अॅड. सुश्मिता धुमाळ यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. दरम्यान, जिल्हा बार असोसिएशनच्यावतीने यंदा रांगोळी आणि पाककृती स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
- जिल्हा बार असोसिएशनच्यावतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात मेहंदी स्पर्धेलाही महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. न्यायालयीन कामकाज संपल्यानंतर या स्पर्धा घेण्यात येतात. त्यामुळे काम संपल्यानंतर मिळणाऱ्या वेळेत मेहंदी स्पर्धा पार पडल्या. एकसे एक मेहंदी या स्पर्धेसाठी रेखाटण्यात आल्या.