सातारा : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे आषाढात आपल्या माहेरी येणाऱ्या नवविवाहितांना जाता येत नसल्याची खंत लागून राहिली आहे. माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा, वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा, अशी स्थिती नवविवाहितांची झाली आहे.
आषाढ महिना नवविवाहितांसाठी आतुरतेचा असतो. या महिन्यात पाच दिवस नवविवाहितांना हक्काने माहेरी आणले जाते. याच दरम्यान येणारे श्रावण सण आणि त्यातील खेळ नवविवाहितांच्या विशेष आवडीचे असतात; मात्र गेल्या सव्वा वर्षात कोरोनाचे संकट ठाकले आणि प्रत्येकाला घरातच राहण्याची वेळ आली. त्यामुळे ज्यांचे माहेर दूर आहे. अशा नवीन विवाह झालेल्या मुलींना आपल्या माहेरची आठवण सतावू लागली आहे.
आषाढ आणि श्रावण महिन्यात सणानिमित्त नवविवाहितांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे गावागावात वेगवेगळ्या प्रकारचा आनंद, जल्लोष आणि खेळ यंदाही होणार नाहीत असे चित्र दिसते. सलग दुसऱ्या वर्षी कोरोना निर्बंधामुळे यावर मर्यादा आल्या आहेत.
चौकट
मुलीला बघण्यासाठी व्हिडिओ कॉल
लग्न झाल्यानंतर मुलगी दुसऱ्या घरी जाणार हे माहीत असते पण ती तिच्या स्वत:च्या घरी गेली तरी आपलं घर रिकामं होतं. शिक्षणाच्या निमित्तानं आम्ही तिला कुठंच बाहेर पाठवलं नव्हतं. पण आता गेल्या दोन महिन्यांत तिला बघायचं असेल तर केवळ व्हिडिओ कॉल हाच एकमेव पर्याय आहे.
००००००००००
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या माहेरी यायला मुलगीच कचरत आहे. तिच्या मतानुसार लांबून प्रवास करुन माहेरी यायचं. या प्रवासात जर काही बाधा झाली तर मी स्वत:ला माफ नाही करू शकणार. यामुळे हे संकट टळावं आणि लेक माहेराला यावं असं वाटतं.
कोट
सहा महिन्यांपूर्वी माझं लग्न झालं. कोल्हापूर सासर असल्याने कोणी भेटत असतं. मर्यादित झालेल्या लग्न सोहळ्यातही आता माहेरकडच्यांच्या गाठीभेटी पडतात. त्यामुळे माहेरच्या लोकांना भेटणं होतं. अडचण माहेरी राहण्याची आहे. कोरोनामुळे प्रवास करुन येऊन राहणं आरोग्याच्या दृष्टीनेही हानीकारक असल्याने ते मी टाळतेच.
- नेहा जाधव, कोल्हापूर.
कोरोना आता जाईल, मग जाईल म्हणत दीड वर्षे मुक्काम ठोकला. लग्नही कमी लोकांत केलं आणि नंतर गेट टूगेदर करु असं आम्ही ठरवलं होतं. पण दुर्दैवाने लग्नाला आठ महिने झाले तरीही कोरोना जायचा नाही, अशीच भावना मनात येत आहे.