दत्ता यादव-- सातारा --एकेकाळी ‘पेन्शनरांची सिटी’ म्हणून कौतुकानं ओळखल्या जाणाऱ्या साताऱ्यात सध्या पाचपेक्षाही जास्त वृद्धाश्रम ‘हाऊसफुल’ झाले आहेत. त्यामुळे या वृद्धाश्रमात बुकिंगसाठी चक्क ‘वेटिंग लिस्ट’ लागत आहेत. विशेष म्हणजे, गर्भश्रीमंतांच्या घरातले थकले जीवच मोठ्या संख्येने वृद्धाश्रमाच्या छायेत आयुष्याची सायंकाळ व्यतीत करीत आहेत. साताऱ्यातील ‘आनंदाश्रम’ येथे सुरुवातीच्या काळात दोन वृद्ध राहत होते. मात्र आता ही संख्या चाळीसवर पोहोचली आहे. आजच्या विभक्त कुटुंबपद्धतीमुळे नजीकच्या काळात वृद्धाश्रमांची व त्यामध्ये आश्रय घेणाऱ्या वृद्धांची संख्या वाढतच जाण्याची शक्यता आहे. आज केवळ मजबुरी म्हणून अनेक वृद्ध वृद्धाश्रमात राहत असले तरी उद्या ती एक पद्धतच होण्याची शक्यता आहे. भविष्यात नातवंडांना आजी-आजोबांना भेटायचे झाल्यास वृद्धाश्रमात जावे लागेल; मग ऋणानुबंध शोधावे लागतील, अशी परिस्थती येत्या काळात निर्माण होण्याची चिंता वृद्धाश्रम चालकांना लागली आहे. रोज कोणी ना कोणी नातेवाईक येऊन वृद्धाश्रमातील सुविधा आणि जागा उपलब्ध आहे का, याची विचारपूस करून जात आहेत. काही ठिकाणी तर क्षमतेपेक्षा जास्त वृद्ध राहत असल्यामुळे अनेकांना निराश होऊन परत जावे लागत आहे. वृद्ध माणसं सुना-नातवंडांनाच नव्हे, तर जन्म दिलेल्या मुलांनाही नकोशी झाली आहेत. या सर्वाला एकच कारण म्हणजे दिवसेंदिवस भारतीय संस्कृतीमध्ये होत असलेले बदल कारणीभूत आहेत. माहिती तंत्रज्ञानातील बदलांप्रमाणे लोकांच्या विचारसरणीतही बदल होत आहेत. त्यातच पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण अशा विविध समस्यांमुळे घरातील कर्त्या पुरुषांनाही वृद्ध लोक अडगळीचे झाले आहेत. सून, मुलगा पटवून घेत नाहीत, अशा कारणाने वृद्ध लोक वृद्धाश्रमाच्या आश्रयाला जात आहेत. आज आपण एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असलो तरी वृद्धांची ससेहोलपट काही थांबली नाही. दिवसेंदिवस आश्रमातील वृद्धांची संख्या वाढतच चालली असून, तिथेही त्यांना आता ‘प्रतीक्षा’ यादी आहे. ज्यांच्यासाठी खस्ता खाल्ल्या, त्यांच्याकडूनच वृद्धांची उतारवयात परवड होत असल्याने वृद्धाश्रमातील गर्दी वाढत आहे. दोन पिढ्यांमधील सांस्कृतिक अंतर वाढत असल्याचेही अनेकांनी सांगितले. नातीच्या लग्नापुरते आजोबा घरात ! साताऱ्यातील एका वृद्धाश्रमात गेल्या काही वर्षांपासून एक गृहस्थ राहत आहेत. त्यांच्या मुलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत उत्तम आहे. नातीचे लग्न करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यावेळी घरात कोण-कोण आहे, हे प्रश्न समोरून विचारले गेले. त्यावेळी वडील आश्रमात आहेत, हे नव्या पाहुण्यांना कसं सांगायचं. म्हणून लग्न सोहळा होईपर्यंत आजोबांना घरी नेण्यात आलं. दोन दिवसांनंतर त्यांना पुन्हा आश्रमात येऊन सोडण्यात आलं. मात्र, रक्तातीलच लोक अशा प्रकारे जर वृद्धांचा कामापुरता उपयोग करून घेत असतील तर हा समाज नेमका कुठे चालला आहे, असा प्रश्न उपस्थित होतो.............
वृद्धाश्रमातही आता लागली चक्क ‘वेटिंग लिस्ट’
By admin | Published: December 06, 2015 10:47 PM