वाठार निंबाळकर : ‘वाठार निंबाळकर येथे सर्व सुविधा व सोयीयुक्त सुसज्ज विलगीकरण कक्ष एक प्रेरणादायी असून, प्रत्येक गावाने वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी गावात विलगीकरण कक्ष स्थापन केले पाहिजे, तसेच आपले गाव पूर्ण कोरोनामुक्त झाले पाहिजे. यासाठी प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न केला पाहिजे,’ असे मत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.
वाठार निंबाळकर येथे लोकसहभागातून सुरू झालेल्या विलगीकरण कक्षाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच शारदा भोईटे, नंदूभाऊ नाळे, राजीव नाईक-निंबाळकर, प्रकाश तरटे, अमर नाईक-निंबाळकर, लालासाहेब भडलकर, सुनील घोलप, शेखर निंबाळकर, ग्रामविकास अधिकारी आबासाहेब सपकळ, तलाठी संतोष नाबर उपस्थित होते.
गावातील रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेल्या या कक्षासाठी उद्योजक सत्यजित नाईक-निंबाळकर व कमिन्स कंपनी यांच्या आर्थिक मदतीतून, तसेच गावातील लोकसहभागातून अतिशय चांगल्या प्रकारे ४५ बेडचे विलगीकरण कक्ष स्थापन झाले आहे. या कक्षासाठी तंटामुक्तीचे अध्यक्ष नंदूभाऊ नाळे यांनी दोन ऑक्सिजन मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. गावातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी सुमारे ७५ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या विलगीकरण कक्षासाठी डॉक्टर, नर्स तसेच उपस्थित पेशंटसाठी औषध व नाश्त्याची सोय वाठार येथील तरुण मंडळींनी केली आहे.
डॉ. नितीन राठोड, डॉ. अनिकेत जगदाळे, रवींद्र बिचुकले, नेताजी निंबाळकर हे कक्षामधील रुग्णांना सेवा देणार आहेत. गावातील तरुण वर्ग, सर्व ग्रामस्थांच्या सहभागातून प्रत्येक वर्गामध्ये फॅन, तसेच जनरेटर सुविधा, स्वच्छतागृहाची सुविधा, तसेच पाणी फिल्टर सुविधाही करण्यात आली आहे.