मायणी : ‘स्वतःची मातृभाषा वापरणे हे अभिमानस्पद आहे. मग ती मराठी, तमिळ, तेलगू, गुजराती किंवा कोणतीही भाषा असू दे. प्रत्येकाने आपापल्या मातृभाषेचा आदर करायला हवा. लक्षात असायला हवे की, इतर भाषांचा अपमान करून आपली भाषा मोठी होणार नाही, त्यासाठी तिचा जास्तीत जास्त वापर करायला हवा,’ असे प्रतिपादन मराठीचे व्याख्याते महेश जाधव यांनी केले.
भारतमाता विद्यालयात आयोजित केलेल्या कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळकृष्ण इनामदार, उपमुख्याध्यापक महावीर कुदळे, पर्यवेक्षक प्रकाश शिंदे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यालयात मुख्याध्यापक बाळकृष्ण इनामदार यांनी आपले विचार व्यक्त केले, तर प्रकाश शिंदे, विठ्ठल भागवत, संतोष देशमुख यांनी कविता गायन केले. मराठी विभागाच्यावतीने विद्यालयातील मुलांनी काव्य मैफील, पोवाडे, सामूहिक ग्रंथ वाचन, मराठी पारंपरिक वेशभूषा आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे राहुल सावंत यांनी सूत्रसंचालन केले. संतोष देशमुख यांनी प्रास्ताविक केले. अनिता पवार यांनी आभार मानले. यावेळी श्रीमंत कोकरे, श्रीरंग फाळके, अंकुश चव्हाण, राहुल शिंदे, उदय गुरव, दुनेश सोनवलकर, मोहन पावरा, अधिक झगडे, अर्चना माने, सुरेखा पोरे आदी मान्यवर उपस्थित होते.