येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रेरणा दिव्यांग केंद्र आणि वनविभागाच्या संयुक्त विद्यमाने रोपनिर्मिती प्रकल्प आणि सीडबॉल विक्री उपक्रमाचा प्रारंभ मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. मुख्य वनसंरक्षक क्लमेंट बेन, वनाधिकारी महादेव मोहिते, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, नगरसेवक सौरभ पाटील, गटशिक्षणाधिकारी शबनम मुल्ला, अॅड. उषा भेदा यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, प्रेरणा असोसिएशन फॉर दी ब्लाइंड या संस्थेच्या वतीने प्रेरणा दिव्यांग केंद्रातील मुलांनी सीडबॉल तयार केले आहेत. हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. या उपक्रमाचा आदर्श घेऊन प्रत्येकाने निसर्ग संवर्धनाचा ध्यास घ्यावा. निसर्ग संवर्धनासाठी दिव्यांग मुलांनी बनविलेले सीडबॉल विकत घ्यावेत आणि योग्य त्याठिकाणी त्यांचे रोपण करावे. सीडबॉलचे रोपण केले की, आपली जबाबदारी संपत नाही. रोपण केलेल्या सीडबॉलमधून उगवणा-या रोपांचे जतन करणे आणि त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे.
मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन यांनी हा उपक्रम यशस्वीरीत्या सुरू राहण्यासाठी वनविभागाचे संपूर्ण सहकार्य राहील, असे आश्वासन दिले. प्रेरणा असोसिएशन फॉर ब्लाइंडचे पदाधिकारी हणमंत जोशी, सतीश नवले, दिलावर शेख, सुनील रांजणे, सुधीर जाधव उपस्थित होते. दीपक तडाचे यांनी सीडबॉल विकत घेण्यासाठी प्रेरणा केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. त्रिवेणी शिंदे हिच्या स्वागतगीताने कार्यक्रमास सुरुवात झाली. वनाधिकारी अर्जुन गंबरे यांनी आभार मानले.
फोटो : ०२केआरडी०१
कॅप्शन : क-हाड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित रोपनिर्मिती प्रकल्प कार्यक्रमाचे मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने उद्घाटन झाले.