दीपक शिंदे ।सातारा : ‘राज्यात आणि जगात काय चाललंय? याबाबत सर्वांनी माहिती तर घेतली पाहिजेच; पण आपल्या शेतातील पिकाचं काय ? ऊस जाणार का ? तोड होणार का ? गहू कसा पेरणार ? याबाबत तुम्ही काळजी करा. मुंबईत काय चाललंय? याचा फार विचार करू नका. तिथलं सगळं व्यवस्थित होईल,’ असा दुर्दम्य आशावाद शरद पवारांनी सह्याद्री साखर कारखान्याच्या गळीत हंगाम प्रारंभप्रसंगी व्यक्त केला.कोणत्याही परिस्थितीला धैर्याने तोंड देण्याचे कसब शरद पवारांकडे आहे. कधीही हार मानायची नाही, हे तर त्यांनी मनाशी पक्के ठरविलेलेच आहे. अनेक प्रसंगात त्यांचा हा धीरोदात्तपणा समोर आलाय. काही मिळतंय म्हणून हूरळून जाणे नाही तर काही मिळणार नाही म्हणून दु:ख करत बसणे नाही.जे पाहिजे ते मिळविण्याचा प्रयत्न त्यांनी सतत केला आहे. आजही त्यांची हीच मानसिकता अनेकांना प्रेरणादायक ठरते. मुंबईतील सर्व काही व्यवस्थित होईल, तुम्ही काळजी करू नका, असा आशावाद यातूनच निर्माण झाला आहे.गावातील आणि गल्लीतील प्रत्येकजण आज कोणाचे सरकार होणार आणि कसे होणार? याबाबत चर्चा करतो आहे. त्यांनी चर्चा करावी; पण त्यामुळे आपल्या मूळच्या व्यवसायाकडे दुर्लक्ष करू नये, असा सल्लाच शरद पवारांनी या निमित्ताने दिला आहे. राज्यात ज्या घडामोडी होताहेत, त्या होणारच आहेत. त्यामध्ये इतरांनी आपला वेळ घालविण्याची गरज नाही. लोकप्रतिनिधी म्हणून जी जबाबदारी सोपविलेली आहे, ते लोक याबाबत निर्णय घेतील आणि चांगला निर्णय होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.शरद पवारांनी जो आशावाद व्यक्त केला तो त्यांनी स्वत:च्या जीवनातही निर्माण केला आहे. ज्या आजाराच्या भीतीने माणूस अर्धा गारद होतो, अशा आजारावर मात करत डॉक्टरलाच धडकी भरविण्याचे काम पवारांनी केले होते. ‘या आजाराची भीती घालू नकोस, तुला पोहोचवूनच मी जाईन,’ असे त्यांचे वक्तव्य सर्वांनाच धक्कादायक होते.आजही राज्यात एवढ्या घडामोडी सुरू असताना शरद पवार यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने कºहाडात आले आणि प्रीतिसंगमावर नतमस्तक झाले.यशवंतरावांचे स्मृतिस्थळ ठरते ऊर्जास्त्रोतयशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवारांनी एखादं- दुसरी वेळ वेगळता हा कार्यक्रम कधीही चुकविला नाही. ज्यांनी राज्याची सुरळीत घडी बसविली, त्या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना उजाळा देत ते मुंबईतील घडामोडींसाठी रवाना झाले; पण जाताना एक ऊर्जा घेऊन गेले. ‘तुम्ही काळजी करू, नका मुंबईतील सर्व काही ठीक होईल. राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचेच सरकार येईल,’ असा विश्वास व्यक्त केला.
सगळं ठीक होईल; तुम्ही शेतीचं बघा : शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 11:52 PM