दत्ता यादवसातारा : अवघे बारावी शिक्षण झालेल्या व सध्या हमाली करणाऱ्या मुलाने बापाच्या खुनाचा एक एक पुरावा गोळा केलाय. एवढेच नव्हे तर, मारहाणीत बापाचा खूनच झालाय, हे सिद्ध करण्यासाठी आता हे पुरावे घेऊन गेल्या तीन महिन्यांपासून मुलगा पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवतोय. मात्र, गुन्हा नोंदविण्याचे धारिष्ट्य म्हणे, पोलीस दाखवत नाहीत.जावळी तालुक्यातील काटवली पोस्ट दापवडी येथील सदाशिव धोंडीबा बेलोशे (वय ५६) यांना जमिनीच्या वादातून काही जणांनी ४ जुलै २०२१ रोजी रात्री साडेआठ वाजता बेदम मारहाण केली. त्यावेळी घरात त्यांची मुलगी आणि पत्नी होती. त्यांचा थोरला मुलगा तुषार हा मुंबई येथे हमाली करतो. वडिलांना मारहाण झाल्याचे समजल्यानंतर मुलगा लगेच मुंबईहून गावी आला. वडिलांना घेऊन तो मेढा पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या करहर पोलीस चौकीत गेला.वडिलांनी मारहाण करणाऱ्यांची नावे स्वत: सांगितल्यानंतर पोलिसांनी संबंधित संशयितांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्यानंतर वडिलांना घेऊन मुलगा घरी गेला. छाती, पाठीवर आणि हातावर मारहाणीच्या खुना दिसत होत्या. नजीकच्याच एका खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी प्राथमिक उपचार घेतले. मात्र, तिसऱ्या दिवशी त्यांना उजव्या छातीजवळ मारहाण झाली होती. तिथं प्रचंड वेदना होऊ लागल्या. मुलाने वडिलांना पाचवड मधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले.डॉक्टरांनी त्यांच्या छातीचा एक्स रे काढला असता, छातीमध्ये पू पाणी झाल्याचे दिसले. छातीमध्ये हळूहळू अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यामुळे ते अत्यवस्थ झाले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या छातीतून तब्बल दीड लीटर पू पाणी बाहेर काढले. मात्र, तरीही त्यांची प्रकृती सुधारली नाही. त्यामुळे त्यांना तत्काळ साताऱ्यातील खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र, इथे पाचव्या दिवशी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता या घटनेला तीन महिने उलटून गेलेत. मात्र, तरी सुद्धा संबंधितांविरोधात गुन्हा दाखल झाला नाही. या घटनेनंतर मुलाने संबंधितांविरोधात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ठोस पुरावे नसल्याचे कारण सांगत पोलीस एक एक दिवस पुढे ढकलतायत म्हणून मुलानेच बापाच्या खुनाचे पुरावे शोधले. आता हे पुरावे घेऊन तो म्हणतोय, आता तरी गुन्हा दाखल करा.
काय आहेत पुरावे..बापाला मारहाण करतानाची व्हिडिओ क्लिप..डॉक्टरांनी उजव्या छातीतून काढलेलं बाटलीभर रक्त..खासगी डॉक्टरांचा वडिलांवर उपचार केल्याचा रिपोर्ट..एक्स रेची कॉपी..ॲटॅकने मृत्यू झाला असल्याचे कोणतेही पुरावे नाहीतवडिलांनी मृत्यूपूर्वी दिलेली तक्रार..
व्हिडिओ क्लिप भक्कम पुरावा..४ जुलैला रात्री जेव्हा तुषारच्या वडिलांना मारहाण होत होती. त्यावेळी त्याच्या बहिणीने हातचलाखी करून मारहाणीचे व्हिडिओ शूटिंग केले. १७ सेकंदाचा असलेला हा व्हिडिओ या प्रकरणातील विदारक परिस्थिती दर्शवतोय.
पोलिसांच्या पंचनाम्यात काय दडलंय...उजव्या बाजूस छातीजवळ अंतर्गत साठलेले रक्त व पोटावर साकळलेले रक्त दिसतेय.पाठीवर रक्त साकळलेले दिसत आहे.दिनांक ४ जुलै २०२१ रोजी झालेल्या भांडणात मारहाण अंतर्गत छातीला झालेली जखम समजून येत आहे.
शवविच्छेदन अहवाल...सदाशिव बेलोशे यांचे सिव्हिलमध्ये शवविच्छेदन करण्यात आले. या अहवालामध्ये ‘राइट साइड न्यूमोथोरॅक्स’ असे इंग्रजीमध्ये नमूद करण्यात आलंय. याचा अर्थ म्हणे, छातीच्या उजव्या बाजूच्या फुप्फुसामध्ये पाणी व स्त्राव झाल्याने मृत्यू होणे असा आहे.