सातारा : सातारा नगरपालिकेच्या माजी महिला उपनगराध्यक्षांना भाजपचे माजी नगरसेवक धनंजय जांभळे यांनी दमदाटी करत मारहाण केली. दसऱ्याच्या दिवशीच घडलेल्या या प्रकाराने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकारानंतर जांभळे यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, साताऱ्यातील कला वाणिज्य महाविद्यालयाजवळ नगरपालिकेच्या महिला स्वच्छता कर्मचारी बुधवारी सकाळी रांगोळी काढत होत्या. यावेळी एका माजी उपनगराध्यक्षांचे पती घटनास्थळी आले. त्यांनी रांगोळी का काढत आहात, स्वच्छतेचे काम करा असे महिला कर्मचाऱ्यांना सांगितले.
यावेळी तिथे उपस्थित असलेल्या भाजप नगरसेवक धनंजय जांभळे यांचा पारा चढला आणि त्यांनी अरेरावी सुरू केली. काही वेळात संबंधित माजी महिला उपनगराध्यक्षांनी मध्यस्थी करत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र जांभळे यांनी अरेरावी सुरूच ठेवली. यानंतर त्यांनी दमदाटी करत मारहाण केली, असा आरोप माजी महिला उपनगराध्यक्षांनी केला आहे. या घटनेनंतर संबंधित दांपत्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन धनंजय जांभळे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.