सातारा : केंद्राच्या अग्निपथ योजनेला विरोध दर्शवत देशभरात हिंसक निदर्शने होत असतानाच सातारा जिल्ह्यातील मिल्ट्री अपशिंगे या गावातील माजी सैनिकांनी मात्र या योजनेला पाठिंबा दिलाय. ही अग्निवीरांची निवड म्हणजे शिस्तप्रिय, कठोर मेहनत, देशाप्रति आदर आणि माणूस म्हणून घडविणारी फॅक्टरी आहे. याला विरोध होतोय हे निषेधार्हच आहे.पाकिस्तानची संपत्ती नष्ट होत नाही, ती आपलीच संपत्ती आपण नष्ट करतोय, हे विसरू नका असे जाळपोळ करणाऱ्यांवर कॅप्टन उदाजी निकम यांनी कडक शब्दांत ताशरे ओढले. परंतु हळूहळू नागरिकांना ही योजना पटवून देणे गरजेचे होते. लोकांमध्ये जनजागृती झाली असती तर कदाचित या योजनेला विरोध झाला नसता, असं मतही निकम यांनी व्यक्त केले.
सातारा तालुक्यातील अपशिंगे या गावातील प्रत्येक कुटुंबातील किमान एक सदस्य सैन्यात आहे. त्यामुळे या गावची ओळखच मिल्ट्री अपशिंगे अशी आहे. पिढ्यानपिढ्या या गावातील प्रत्येक घरात कोणीतरी सैन्यात कार्यरत आहेच. अशा या सैनिकी वातावरण असलेल्या गावातील आजी-माजी सैनिकांचं अग्निपथ योजनेबाबत लोकमत टीमनं मत जाणून घेतलं. तेव्हा आजी-माजी सैनिक अग्निपथ योजनेविषयी भरभरून बोलले.निवृत्त कॅप्टन उदाजी निकम म्हणाले की, अग्निपथ योजनेला महाराष्ट्रात कुठेच विरोध नाही. मराठी माणूस समजदार आहे. आंध्र प्रदेशमध्ये या योजनेला तीव्र विरोध होतोय. त्याच कारण तेथील एका ॲकॅडमी चालकाच्या ७५ ॲकॅडमी आहेत. त्याच्या पोटावर गदा आली ना. तो माणूस लोकांना हे जाळा ते जाळ असं प्रवृत्त करत होता. हे सगळ तपासात समोर आलंय. आज लोकांना समजलं पाहिजे. देशाच्या हिताची गोष्ट आहे. तिथ तरी अशी कृत्ये केली नाही पाहिजेत. बरं आपण पाकिस्तानची बस जाळली नाही, ट्रेन जाळली नाही. आपलीच मालमत्ता आपण जाळतोय. हे कितपत योग्य आहे. आज पूर्वीसारखी आर्मी राहिली नाही. तसा आता बदल स्वीकारायला पाहिजे.
निवृत्त सुभेदार सुधीर कारंडे यांचही मत असंच आहे. ते म्हणताहेत, अग्निवीर हा एक अनुशाषित बनून परतणार आहे. शिस्तप्रिय बनेल. शिवाय त्यांना पॅकेजही चांगले आहे. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तर बदलेलच. पण इतर क्षेत्रातही त्यांना शासन नोकरीसाठी प्राधान्य देणार आहे. आमच्या गावामध्ये असलेले मुले सैन्यात भरतीसाठी सराव करत आहेत. त्यांना ही योजना नेमकी काय आहे, हे आम्ही समजून सांगत आहे. तसे इतर गावातील आजी-माजी सैनिकांनीही तरुणांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.निवृत्त सुभेदार संदीप निकम यांनी अग्निपथ योजना चांगली असल्याचे म्हटले आहे. गावातील आजी-माजी सैनिक संघटनेने या योजनेला पाठिंबा दिला आहे. युवकांनी चांगली संधी साधून आली आहे. या संधीचं सोनं युवकांनी करावं. चार वर्षांनंतर या अग्निवीरांना शासन इतर ठिकाणी सेवेत सामावून घेण्यासाठी योजना आखत आहे. अग्निपथ योजनेवर देशाच्या काही भागांत विरोध सुरू असला, तरी आम्ही एक गाव म्हणून याबद्दल सकारात्मक आहोत.
या गावाने ४६ सैनिक गमावले...
पहिल्या महायुद्धात आणि स्वातंत्र्योत्तर काळात मिल्ट्री अपशिंगे या गावाने आपले सुमारे ४६ सैनिक गमावले, या गावातील अनेक सैनिकांनी १९६२ च्या चीनविरुद्धच्या युद्धासह, १९६५ च्या युद्धात भाग घेतला. आणि १९७१ चे पाकिस्तान आणि कारगिल युद्धातही सैनिकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली.