महाबळेश्वर : प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या पार फाटा ते कुमठे या दरम्यान चार किलोमीटर रस्त्यासाठी ठेकेदाराने पूर्वपरवानगी न घेता जिलेटिनचे स्फोट करून मोठ्या प्रमाणात गौण खजिन उत्खनन केले आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या तालुक्यात अशा प्रकारे ठेकेदार सर्व नियम धाब्यावर बसवून निसर्गाची हानी करीत असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. वनसंपदेचे संवर्धन व्हावे, यासाठी केंद्र सरकारने २००१ मध्ये महाबळेश्वर तालुका हा पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील क्षेत्र (इको सेन्सिटिव्ह झोन) म्हणून जाहीर केला आहे. यामुळे विनापरवाना बांधकाम, वृक्षतोड व गौण खनिज उत्खनन यावर निर्बंध लागू झाले आहेत. तसेच तालुक्यावर देखरेख ठेवण्यासाठी उच्चस्तरीय सनियंत्रण समिती नेमण्यात आली आहे. ही समिती केंद्र शासनाने लागू केलेल्या निर्बंधाची अमलबजावणी केली जाते की नाही, यावर देखरेख ठेवते. त्याचप्रमाणे या संदर्भात संबंधित खात्याच्या अधिकारी यांना सूचना अथवा शिफारस करीत असते. जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी तसेच तालुका अधिकारी यांच्याबरोबर या समितीच्या नियमित बैठका होत असतात. असे असतानाही सर्व नियम पायदळी तुडवून ठेकेदाराने प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या एका डोंगरकड्याजवळ मोठ्या प्रमाणावर गौण खनिज उत्खनन केले आहे. (प्रतिनिधी)
महाबळेश्वरात स्फोटकाच्या साह्याने उत्खनन
By admin | Published: March 22, 2015 12:14 AM