सातारा : कोरोनाला रोखण्यासाठी प्रत्येक गाव, शहर वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. वाई तालुक्यातील उडतारे ग्रामस्थांनी कोरोनाला रोखण्यासाठी गावबंदीचा उतारा केला आहे.
तालुक्याच्या पश्चिमेकडील गावांमध्ये जाण्यासाठी बहुतांश मार्ग बंद झाल्याने उडतारे येथील रस्त्यावर वर्दळ वाढलेली होती. उडतारे येथून कुडाळ मार्गे हुमगाव, मेढ्याकडे एक रस्ता जातो तर दुसरा एक रस्ता कुडाळमार्गे पाचगणी, महाबळेश्वरकडे जातो. सहाजिकच इतर सर्व मार्ग बंद असल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. दुचाकी चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणावर त्या रस्त्यावरून जात आहेत.
या पार्श्वभूमीवर गावातील युवकांनी वाहनबंदीचा प्रस्ताव ग्रामपंचायती पुढे ठेवला. त्यानुसार महामार्गालगत शहीद जवान अशोक बाबर स्मृती प्रवेशद्वारावर रेल्वे गेटप्रमाणे गेट तयार केले आहे. संपूर्ण दिवस गेट बंद ठेवण्यात येते. अत्यावश्यक सेवेतील वाहने तसेच शेतामध्ये बैलगाडी घेऊन जाणाºया शेतकऱ्यांना, डेअरीसाठी दूध घालण्यासाठी येणाºया वाहनांसाठी इथून प्रवेश दिला जातो.
पुण्या-मुंबईतून दाखल होणाºया लोकांची नावनोंदणी ग्रामपंचायतीच्यावतीने या प्रवेशद्वारावरच केली जाते. सहाजिकच उडतारेसह सर्जापूर, कळंबे, कुडाळ, हुमगाव, सोनगाव या गावांमध्ये बाहेरून येणाºया लोकांची माहिती एकत्रितपणे या ठिकाणी मिळत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठा हातभार लागलेला आहे. दरम्यान, जिल्हा बाहेरून जे लोक गावात दाखल होतात, त्यांच्यासाठी बाळासाहेब पवार हायस्कूल उडतारे या ठिकाणी क्वॉरंटाईन कक्ष सुरू करण्यात आलेला आहे. सावधगिरीची उपाययोजना म्हणून बाहेरून येणाºया लोकांना थेट क्वॉरंटाईन कक्षात धाडले जात आहे. याठिकाणी १४ दिवस ठेवल्यानंतर त्यांना घरी पाठवले जाते.
ग्रामपंचायतीच्यावतीने संपूर्ण गावात कोरोनाविषयी जनजागृती करण्यात येत आहे. जे लोक सांगूनही ऐकत नाहीत, अशा लोकांची नावे पोलिसांना कळवली जात आहेत. गावात भुर्इंज पोलीस ठाण्याचे वाहने ही फिरत असल्याने लोकांमध्ये जागृती निर्माण झालेली आहे. उडतारेच्या सरपंच माधुरी पवार, उपसरपंच हेमलता बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी तसेच सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते कोरोनाशी लढा देण्याच्या मोहिमेत उत्साहाने काम करताना दिसत आहेत.बाहेर फिरणाºयाला पाचशे रुपये दंडगावातील रस्त्यावर विनाकारण फिरणाºया लोकांना ग्रामपंचायतीने तंबी दिलेली आहे. तरीदेखील जे लोक विनाकारण फिरतील त्यांच्याकडून पाचशे रुपये दंड आकारण्याचा इशारा ग्रामपंचायतीच्यावतीने देण्यात आला आहे.