सातारा : शाहूपुरी येथे काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. ग्रामस्थांची अडचण लक्षात घेऊन शाहूपुरी ग्राम विकास आघाडीतर्फे वीज कंपनीकडे तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन दुरुस्ती मोहीम हाती घेतली आहे.
शाहूपुरीतील विविध भागातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शाहूपुरी ग्रामविकास आघाडीच्या वतीने अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र माने यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनानंतर शाहूपुरीतील विविध भागांची पाहणी करत वीज पुरवठ्यातील अडचणींचा जागेवरच निपटारा करण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून शाहूपुरीतील विविध भागातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. वीज पुरवठा खंडित होण्याबरोबरच अनेक ठिकाणी कमी, तर काही भागात जास्त दाबाने वीज पुरवठा होत होता. त्यामुळे नागरिकांच्या गृहोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्यानंतर शाहूपुरी ग्राम विकास आघाडीच्या भारत भोसले, राजेंद्रकुमार मोहिते, नवनाथ जाधव, सुहास वाहळकर, शोभा केंडे, नीलम देशमुख, माधवी शेटे यांनी जितेंद्र माने यांना निवेदन दिले. शाहूपुरीच्या विविध भागात पाहणी करत कर्मचाऱ्यांना तांत्रिक अडचणी दूर करण्याचे आदेश त्यांनी दिले. यावेळी पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती तसेच उघडे असणारे डीपी बॉक्स बंदिस्त करण्याचे कामही तत्काळ हाती घेण्यात आले. यावेळी माने यांनी शाहूपुरीतील वीज पुरवठा खंडित होणार नाही, असे आश्वासन दिले.