लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा: जिल्ह्यात उत्पादन शुल्कच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चार अवैध दारू विक्री केंद्रावर छापे टाकून चार जणांवर गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून चार दुचाकीसह सुमारे २ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मालगाव, ता. सातारा येथे उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी दारू अड्ड्यावर छापा टाकून १०८ सीलबंद दारूच्या बाटल्या आणि एक दुचाकी जप्त केली. याप्रकरणी धीरज प्रदीप कदम (रा, मालगाव, ता. सातारा) याला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच खोलवडी, पोस्ट मालगाव तालुका सातारा गावच्या हद्दीत श्रीकांत सूर्यकांत जगताप (रा. खोलवडी, पोस्ट मालगाव याच्या ताब्यातून ७५० मिली क्षमतेच्या गोवा राज्यात विक्री करण्यासाठी आणलेल्या विदेशी दारूच्या १०८ सीलबंद बाटल्या व एक दुचाकी जप्त करण्यात आली. तसेच वाई तालुक्यातील पांडे येथे तुषार सुरेश पवार यांच्या ताब्यातून ७५९ मिलीच्या गोवा राज्यात विक्रीसाठी आणलेल्या विदेशी दारूच्या १२ बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्याचबरोबर बामणोली तर्फे कुडाळ तालुका जावळी येथे निखिल शंकर तरडे याच्या ताब्यातून ७५० मिली क्षमतेच्या विदेशी दारू च्या एकूण १२ सीलबंद बाटल्या व एक दुचाकी जप्त करण्यात आली.
या कारवाईमध्ये उत्पादन शुल्कचे अधीक्षक अनिल चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक नंदू क्षीरसागर, रोहित माने, शांताराम डोईफोडे, संतोष निकम, सचिन खाडे, महेश मोहिते, नितीन जाधव, अजित रसाळ, जीवन शिर्के, सागर साबळे नरेंद्र कलकुटगी यांनी भाग घेतला.