मायणी : सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या विविध विषयांवर सर्व शिक्षकांची तयारी व्हावी, यासाठी चितळी (ता. खटाव) केंद्रामध्ये केंद्रसंचालक रमजान इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षाची पहिली शैक्षणिक ऑनलाईन परिषद पार पडली.
चितळी केंद्राअंतर्गत येणाऱ्या विविध शाळांमध्ये कोणकोणते शैक्षणिक व बाह्य उपक्रम राबवावे, यासाठी ऑनलाईन शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी चितळी केंद्राचे संचालक रमजान इनामदार यांनी शिक्षण परिषदेची पूर्वतयारी, शिक्षण परिषद उद्देश व सीआरजी समिती या विषयावर मार्गदर्शन केले.
नूतन केंद्रप्रमुख मोहन साळुंखे यांनी शाळा व परिसर स्वच्छता, संगीता माने यांनी या वर्षीपासून नव्याने समाविष्ट झालेल्या ब्रीज कोर्स, शाळा पूर्वतयारी, मंगेश खिलारे यांनी मुलांच्या शिकण्यामध्ये पालकाची भूमिका तर राजन घोसपूरकर यांनी माझे मूल माझी जबाबदारी व शाळा व्यवस्थापन समिती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. अशाच पद्धतीने वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.