कऱ्हाड : येथील महात्मा फुले नगरमधील सामाजिक कार्यकर्ते सुरज घोलप यांची दलित महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महासंघाच्या ३० व्या वर्धापन दिनी सुरज घोलप यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल समतावादी महिला मंचच्या अध्यक्ष प्रा. पुष्पलता सकटे, सरचिटणीस शंकरराव महापुरे, पारधी मुक्ती आंदोलनाचे अध्यक्ष प्रकाश वायदंडे, अभिनेत्री माधुरी पवार, रमेश सातपुते, बहुजन समता पक्षाचे जिल्हाध्यक्ष रामराव दाभाडे, तालुकाध्यक्ष दिलीप सकटे, अमोल साठे, हरिभाऊ बल्लाळ, आदींनी घोलप यांचा सत्कार केला.
इंधन दरवाढीमुळे मालवाहतूक महाग
कऱ्हाड : गत काही दिवसांपासून इंधन दरवाढ गगनाला भिडली आहे. त्याचा फटका प्रवास व माल वाहतुकीला बसला असून, भाड्यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. कोरोना काळात महागाई वाढली आहे. जीवनावश्यक वस्तूंबरोबरच आता पेट्रोल व डिझेलच्या किमतीही शतकापार गेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असून, दैनंदिन खर्च भागवताना जीव मेटाकुटीला येत आहे. कोरोनामुळे सर्वप्रकारची प्रवासी वाहतूक पन्नास टक्के क्षमतेने होत आहे. त्यातच वारंवार होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे माल वाहतुकीसाठी आकारल्या जाणाऱ्या भाड्यातही वाढ झाली आहे.
युवावर्ग अद्यापही लसीकरणापासून वंचित
कऱ्हाड : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणावर भर देण्यात येत असला तरी लसीच्या कमी उपलब्धतेमुळे युवावर्ग अद्यापही लसीकरणापासून वंचित राहिला आहे. कोरोना प्रतिबंधित लसीकरण वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये राबविण्यात येत आहे. सुरुवातीला साठ वर्षांवरील व त्यानंतर ४५ वर्षांवरील आणि सध्या १८ ते ४४ वयोगटातील सरसकट लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, लसीचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने युवावर्गाला लस मिळत नसल्याची परिस्थिती आहे.