कऱ्हाड : येथील गाडगे महाराज महाविद्यालयात बास्केटबॉल कोर्टचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. शिवणकर यांच्या हस्ते झाले. यावेळी अॅड. रवींद्र पवार, प्राचार्य मोहन राजमाने, अॅड. सदानंद चिंगळे, जितेंद्र डुबल, माजी जिमखाना प्रमुख उपस्थित होते. आर. वाय. गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. जिमखाना प्रमुख प्रा. विद्या पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
येरफळे येथील स्मशानभूमीत वृक्षारोपण
कऱ्हाड : येरफळे, ता. पाटण येथील स्मशानभूमीत ‘माझे झाड, माझी जबाबदारी’ या उपक्रमातून आधार जनसेवा सामाजिक संस्थेच्यावतीने अनिल मोहिते यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. संस्थेचे सदस्य लक्ष्मण पाटील यांनी विविध प्रकारची झाडे लावली. गतवर्षी वड, पिंपळ, बेल, गुलमोहर, करंज, जांभुळ, कांचन अशी झाडे लावून व संरक्षक जाळ्या बसवून ती जगविण्यात आली. वृक्षारोपणासाठी लक्ष्मण पाटील, सोमनाथ नागरे, शेखर धामणकर, राहुल कदम, सोमनाथ जंगम, रती नागरे, बाळकृष्ण पाटील, सचिन पाटील, प्रथमेश पुजारी, श्रेयस पाटील, प्रल्हाद पाटील, आराध्या पाटील यांनी परिश्रम घेतले.
तळमावले विभागात कोळपणीवर भर
कऱ्हाड : पाटण तालुक्यातील तळमावले विभागात कोळपणीच्या कामांना वेग आला आहे. शिवारामध्ये सगळीकडे शेतकरी शेतामध्ये कोळपणीचे काम करताना दिसून येत आहेत. मान्सूनपूर्व पेरणीनंतर पाऊस झाल्यामुळे पिके चांगली आली आहेत. मात्र दोन आठवड्यांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. उगवून आलेल्या पिकांना पावसाची अत्यंत गरज असते. सोयाबीन, भुईमूग, ज्वारी, मका, भात व इतर कडधान्य खरीप हंगामातील पिके चांगल्या प्रकारे आली असून पिकांना पावसाची गरज आहे.
कॅनॉल ते कॉलेजपर्यंत पादचारी मार्ग दुरवस्थेत
कऱ्हाड : कृष्णा कॅनॉल ते कॉलेज रस्त्याकडेला असलेल्या पादचारी मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी कठडे ढासळले आहेत. तसेच त्याखालील नाल्यातील सांडपाणीही रस्त्यावरून वाहत आहे. सांडपाण्याची दुर्गंधी परिसरात पसरत आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. तसेच कृष्णा कॅनॉलपासून बनवडीपर्यंतचा रस्ताही दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.