सणबूर : घाटमार्गावरील अत्यंत धोकादायक वळणामुळे वाल्मीकी पठारावरील अनेक गावे व वाड्यावस्त्या डांबरी रस्ता होऊनही एसटीपासून वंचितच आहेत. श्री वाल्मीकी यात्रेदिवशी वर्षातून फक्त एकच दिवस तेथे मोठी कसरत करत एसटी धावते. अन्य वेळी मात्र वडापचाच आधार उरतो.
वाल्मीकी पठार पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला येत आहे. सह्याद्री व्याघ्र राखीवअंतर्गत समाविष्ट असलेला हा परिसर वन्यजीव विभागाच्या अखत्यारीत आहे. वन्यजीव विभागाच्या माध्यमातून पर्यटन विकासाबरोबरच रोजगाराच्या विविध सुविधा देण्याचे कामही तेथे सुरू आहे. वाल्मीकी ॠषींची तपोभूमी म्हणून ओळखल्या जाणा-या वाल्मीकीवर महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. पठारावर पानेरी, तामिणे, रूवले, उधवणे, पाटीलवाडी, कारळे, धावडवाडा, धनगरवाडा आदी गावे व वाड्यावस्त्या आहेत. ढेबेवाडी व सणबूर ही ठिकाणे या गावासाठी मध्यवर्ती ठिकाणे असून आठवडाबाजार व अन्य दैनंदिन कामासाठी पठारावरील नागरिकांची सतत वर्दळ असते. काही वर्षांपूर्वी टप्प्याटप्प्याने झालेल्या डांबरी रस्त्यामुळे ही गावे संपर्कात आली असली, तरी अद्याप येथील वाहतूकव्यवस्था फारशी सुधारलेली नाही.
सणबूर ते वाल्मीकीपर्यंतचा घाटमार्ग धोकादायक वळणामुळे अपघाताला नियंत्रण देत आहे. या रस्त्यावरून एसटीची वाहतूक सुरू नाही. चार किलोमीटरच्या घाटमार्गात सहा धोकादायक वळणे आहेत. त्यापैकी तीन वळणे जीवघेणी आहेत. एसटी वाहतूक सुरू करण्यासाठी येथील ग्रामस्थ वारंवार मागणी करत असले, तरी रोड सर्व्हेमध्ये या वळणांचीच अडचण समोर येत असल्याने फक्त यात्रेदिवशीच कशीबशी एसटीची वाहतूक सुरू ठेवली जाते. इतर दिवशी वडापचाच आधार घ्यावा लागतो.
चौकट
वाल्मीकी यात्रेदिवशी विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने भाविक येतात. एसटी महामंडळामार्फत त्यादिवशी व्यवस्था केली जाते. मात्र, घाटातील प्रत्येक वळणावर बस अडखळत असल्याने चालकाला कसरत करावी लागते. शिवाय, एसटीतील प्रवाशांचा जीव टांगणीला लागलेला असतो.
प्रतिक्रिया
श्रीक्षेत्र वाल्मीकीला पर्यटनस्थळाचा ‘क’ दर्जा मिळाला आहे. पर्यटन केंद्राच्या विकासासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडे निधी मिळावा म्हणून मागणी केली होती. ती त्यांनी मान्य करून या परिसराच्या विकासासाठी एक कोटी रुपये मंजूर केले. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी भाविकांसह पर्यटकांची संख्या वाढेल. घाटातील धोकादायक वळणे आहेत, ती तोडून घाटात रुंदीकरण व्हावे, यासाठी प्रयत्न व्हावेत.
- किरण असवले-पाटील
उपाध्यक्ष, शरद पवार विचार मंच, महाराष्ट्र राज्य