सातारा : राज्यातील एक रकमी थकीत ऊस बिल कायदेशीर न मिळाल्याने सह्याद्री सहकारी साखर कारखान्यासमोर २५ मार्च रोजी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिली.
यासंदर्भात जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कायद्यानुसार एक रकमी दर न देता मोडतोड करून दिल्याने शेतकऱ्यांच्या जीवनमानावर प्रचंड मोठा परिणाम झालेला आहे. पिकविलेल्या उसाचे ऊस बिल कायदेशीर एक रकमी न देता व त्यावरील व्याज न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील चेअरमन असलेल्या सह्याद्री साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर आदरणीय पी. डी. पाटील यांच्या पुतळ्याजवळ २५ मार्च रोजी सकाळी ११ वाजल्यापासून न्याय मिळेपर्यंत सर्व अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना बरोबर घेऊन बेमुदत धरणे आंदोलन केले जाणार आहे.
अन्यायकारक वीज बिल वसुली विरोधात भव्य रास्ता रोको आंदोलन संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात महावितरण कंपनीच्या विरोधात व स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हा यांच्या वतीने सातारा - कोरेगाव रोडवर महावितरण कार्यालय कृष्णानगर समोर रास्ता रोको आंदोलन शुक्रवार, दि. १९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. तरी सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यावसायिक, घरगुती ग्राहक, शेतीपंपधारक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हा जिल्हाध्यक्ष राजू शेळके, अर्जुन साळुंखे, रमेश पिसाळ, संजय जाधव, ॲडव्होकेट विजय चव्हाण, मनोहर येवले यांनी केले आहे.