रहिमतपूर : राज्य सरकारकडून थकीत कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली; परंतु नियमित शेती पिकासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अद्याप एका दमडीचीही मदत मिळालेली नाही. ‘थकितवाले तुपाशी अन् नियमितवाले उपाशी’ ठेवणाऱ्या राज्य सरकारच्या नावाने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा होळीपूर्वीच शिमगा सुरू झाला आहे.
महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यावेळी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांची मदत करणार असल्याचे जाहीर केले. थकीत कर्जदारांना कर्जमाफी मिळाली; मात्र नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अद्याप एका दमडीचीही मदत केली नाही. पहिल्यांदा नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाच आर्थिक मदत मिळणे गरजेचे होते. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने आर्थिक मदत केली असती, तर नियमित कर्ज भरणाऱ्यांची संख्या आणखी वाढली असती. पोटाला चिमटा घेऊन ज्यांनी कर्जाची परतफेड केली, त्यांना आर्थिक मदतीच्या स्वरूपात आधार देणे गरजेचे होते, परंतु थकीत कर्ज असणाऱ्यांना माफी दिली गेली.
कर्जमाफी मिळाले तेही शेतकरीच आणि नियमित कर्ज भरणारेही शेतकरीच आहेत. त्यामुळे कर्जमाफी दिलेल्या निर्णयांचे शेतकऱ्यांतून स्वागत होत आहे. परंतु वारंवार पडणारा दुष्काळ, महागाईचे चटके व शेतीमालाला नसलेला हमीभाव यामुळे सर्वच शेतकरी चारीबाजूने भरडला जात आहे. पोटाला चिमटा घेऊन विदारक परिस्थितीत विकास सेवा सोसायट्या व बँकांची देणी वेळेत भागवली अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा लाभ मिळणे गरजेचे होते. परंतु काहीतरी निमित्त करून सरकारकडून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची टोलवाटोलवी सुरू आहे. सरकारच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांचा नियमित कर्ज भरण्याकडे कल कमी होण्याची शक्यता निर्माण होण्याची शक्यता आहे.
चाैकट :
पन्नास हजारांची मदत तातडीने करा
थकीत कर्जदारांना कर्जमाफी आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांना केवळ आश्वासनाचे ढोस दिले जात आहेत. सरकारच्या या दुटप्पी भूमिकेमुळे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांत खदखद सुरू झाली आहे. आम्ही वेळेत कर्जाचा भरणा केला, हीच मोठी चूक झाली, अशी प्रतिक्रिया नियमित कर्ज भरणारे अनेक शेतकरी व्यक्त करत आहेत. दरम्यान, राज्य सरकारने आश्वासनाप्रमाणे पन्नास हजारांची मदत तातडीने करावी, अशी मागणी होत आहे.