सातारा : ‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला झाला, ही बाब गंभीर, तसेच दुर्दैवी आहे, याची माहिती पोलिसांनाही हवी होती, पण याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच जबाबदार असून, एसटी कर्मचाऱ्यांची शासनात विलीनीकरणाची मागणी कठीण नाही,’ अशी रोखठोक भूमिका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केली.
सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री आठवले बोलत होते. यावेळी ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड उपस्थित होते.
मंत्री आठवले म्हणाले, ‘काँग्रेस पक्ष खिळखिळा झाला आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचे नेतृत्व मिळूनही पक्षाला यश मिळत नाही. त्यातच महाराष्ट्रातील तीन पक्षांचे एकत्रीकरण चुकीचे ठरले आहे. शिवसेनेवरही लोकांचा विश्वास नाही. मतदार नाराज आहेत. त्यामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत भाजपच १०० टक्के जिंकणार हा विश्वास आहे. त्याचबरोबर, २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजप व मित्रपक्ष ४०० हून अधिक जागा जिंकतील. राज्यातही भाजपचेच सरकार सत्तेवर असेल.
एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानावर हल्ला केल्याचा प्रश्न उपस्थित केल्यावर मंत्री आठवले म्हणाले, ‘आंदोलन हे शांततेत व्हायला हवं होतं. हा हल्ला दुर्दैवी आहे. मी राज्यात मंत्री असताना अशी मागणी झाली नाही. एसटी कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष झाले, पगार नाही. त्यामुळे आत्महत्या वाढल्या आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा चुकीचा वापर होतो का, या प्रश्नावर त्यांनी या यंत्रणा मुद्दाम चौकशी करीत नाहीत. कोणाला चुकीचे वाटत असेल, तर त्यांनी न्यायालयात पुरावे द्यावेत. कारण या यंत्रणा स्वतंत्र व कोणाच्याही दबावाखाली तपास करीत नाहीत, असे उत्तर दिले. इंधनदरवाढीवर त्यांनी निवडणुका आल्या की, दर कमी होतील, असे उत्तरही हास्य करीत दिले.
मुंबई पालिकेतून सेनेला बाहेर काढू; मनसेचं भाषणाचं वादळ...
पत्रकार परिषदेत मंत्री रामदास आठवले यांनी भाजप आणि ‘रिपाइं’ एकत्र येऊन मुंबई महानगरपालिकेतून शिवसेनेला बाहेर काढू. त्याचप्रमाणे, नियोजन सुरू आहे, असे सांगितले, तर भाजप आणि मनसेची जवळीक वाढत आहे. मनसेला बरोबर घेणार का, असा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर आठवले यांनी, मनसेची गरज नाही. भाजपने त्यांना बरोबर घेतले, तर पहिल्यांदा ते माझ्याशी बोलतील, पण हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे मनसेला फार मते मिळणार नाहीत. त्यांचं भाषण आणि सभांचंच वादळ आहे, असा टोमणाही मारला.
दोन्हीराजेंमधील वाद मिटवणार...
साताऱ्यातील दोन्ही राजेंशी माझे स्नेहाचे संबंध आहेत. एक आमदार असून, दुसरे खासदार आहेत. त्यांच्यातील वाद मिटविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असेही मंत्री आठवले यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर दिले.