कुडाळ: आज-काल लग्नसमारंभ थाटामाटात साजरा करण्यात अनेकांना धन्यता वाटते. आपला मोठेपणाचा अहंभाव मिरवण्यासाठी लग्नामध्ये वारेमाप खर्च करतात. या सर्वांना फाटा देत जावळी तालुक्यातील भालेघर गावच्या दिलीप नारायण पवार यांनी मुलीच्या लग्नासाठीचा येणारा अनावश्यक खर्च टाळून गावच्या विकासास हातभार दिला आहे.
याबाबत माहिती अशी की, भालेघर येथील मुंबईस्थित दिलीप पवार यांच्या मुलीचा विवाह राजपुरी येथील दिलीप राजपुरे यांचे चिरंजीव रोहित यांच्याशी ठरविण्यात आला होता. दोन्ही कुटुंबीयांनी मुलांचे लग्न साधेपणाने करण्याचा निर्णय घेऊन मुलांचा विवाह नोंदणी पद्धतीने केला. लग्नातील वायफळ खर्च वाचवून पवार कुटुंबीयांनी गावच्या विकासासाठी २१,१११ रुपयांचा निधी देणगी म्हणून दिला. मुलामुलींच्या हस्ते ही देणगी भालेघर उत्सव कमिटीच्या अध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात आली. सामाजिक जाणिवेच्या दातृत्व भावनेतून गावच्या विकासासाठी वेगळा दृष्टिकोन बाळगून दिलीप पवार यांनी सामाजिक बांधीलकीचा आगळावेगळा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.
चौकट :
सामाजिक दरी दूर होण्यास मदत
लग्न समारंभात होणाऱ्या भरमसाट खर्चाला फाटा देत सामाजिक दायित्व दाखवून इतरांना नवी दिशा देणाऱ्या अशा विचारप्रवाहांची गरज आहे. यातूनच सामाजिक दरी दूर होण्यास मदत होईल. ग्रामीण भागातही विकासाची दूरदृष्टी ठेवून भालेघर गावचे प्रतिष्ठित लोक समाजापुढे वेगळा आदर्श ठेवत नवीन विचारांची प्रेरणा देत आहेत.
फोटो :
०३कुडाळ
भालेघर येथील दिलीप पवार यांनी मुलीच्या लग्नातील अनावश्यक खर्च टाळून नवदाम्पत्यांच्या हस्ते गावच्या विकासासाठी देणगी दिली. (छाया : विशाल जमदाडे)