महाबळेश्वर : राज्यात थंडीचा कडाका वाढत असतानाच महाराष्ट्राचे नंदनवन असलेल्या महाबळेश्वरात सध्या सिमल्याचा अनुभव येत आहे. सलग दुसऱ्या दिवशी वेण्णा लेक परिसरात हिमकणांची चादर पसरली आहे. निसर्गाचा नजराणा अनुभवण्यासाठी हौसी पर्यटक व महाबळेश्वरचे ग्रामस्थ भेट देत आहेत. काश्मीर, कुलू मनाली, सिमला येथे प्रचंड बर्फवृष्टी सुरू असतानाच महाबळेश्वर या पर्यटनस्थळी रविवारी सलग दुसऱ्या दिवशी थंडीचा जोर वाढला आहे. महाबळेश्वरचे शनिवारी पहाटे १२.६ अंश सेल्सिअस तापमान होते. यात रविवारी पहाटे दोन अंशाची घसरण होऊन १०.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. वेण्णा तलावातील पाण्यामुळे या परिसरातील तापमान ४ ते ५ अंशांवर येते. या तापमानात दवबिंदू गोठण्याची प्रक्रिया सुरू होते. प्रसिद्ध वेण्णा तलाव-लिंगमळा परिसरातील निसर्गाने ओढलेली हिमकणांची पांढरी शुभ्र दुलई तशीच पांघरलेली कायम पाहावयास मिळाली. निसर्गाच्या या चमत्काराची मौज मनमुरादपणे लुटण्यासाठी पर्यटक, निसर्गप्रेमी व स्थानिकांनी वेण्णा तलाव व लिंगमळा परिसर बहरला होता. तलावातील जेटीवर मोठ्या प्रमाणावर दवबिंदू गोठल्यामुळे हिमकण जमा झाले होते व संपूर्ण जेटी पांढरी शुभ्र झाल्याचे दिसत होते. वेण्णा तलावाचा पृष्ठभाग थंड वाफांमुळे व्यापून गेला होता. त्याचे मनोहारी दृष्य निसर्गप्रेमींना भुरळ घालत आहे. लिंगमळा परिसरातील स्ट्रॉबेरी, फराशी फळे, पालेभाज्याच्या बागा हिमकणांनी अच्छादल्या होत्या. स्मृतिवन परिसरातही दवबिंदू गोठल्यामुळे वनस्पतींची पाने, फुले, वेलींनी हिमकणांचा साज अंगावर परिधान केल्याचे विहंगम दृष्य मनाला मोहून टाकत होते. (प्रतिनिधी)साताऱ्याचे तापमान ७.४जिल्ह्यातील सर्वच भागात थंडीचा कडाका वाढला आहे. महाबळेश्वरचे रविवारचे तापमान किमान १०.६ कमाल २६.१ असताना साताऱ्याचा पारा मात्र भलताच खाली आला होता. सातारा शहरातील पहाटेचे तापमान ७.४ तर कमाल ३१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
महाबळेश्वरमध्ये सिमल्याचा अनुभव!
By admin | Published: January 08, 2017 11:37 PM