वाई : ज्या दुर्गम भागात आजपर्यंत फक्त गहू, भात, नाचणी अशी पारंपरिक पिके घेतली जात होती़ त्या परिसरात जितेंद्र गोळे यांनी आधुनिक पद्धतीने शेतीमध्ये विदेशी भाजीपाला, देशी भाजीपाला, स्ट्रॉबेरी अशा प्रकारच्या पिकांचे उत्पादन घेऊन परिसरातील शेतकऱ्यांंपुढे आदर्श निर्माण केला आहे़ यामुळे जितेंद्र गोळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे़गोळेगाव वाई तालुक्यातील अतिदुर्गम भागात मोडते. पावसाचे अति प्रमाण व सधन शेतीच्या भावामुळे पश्चिम भागातील अनेक तरुण नोकरीसाठी मुंबई, पुणे व इतरत्र सऱ्हास जाताना दिसत आहेत़ जितेंद्र गोळे यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले, त्यानतंर हॉटेल मॅनेजमेंन्टचा कोर्स करून काही दिवस नोकरी केली. परंतु नोकरीत मन रमेना म्हणून शेतीमध्ये काहीतरी नवीन करायचं ठरविले. आपल्या गावातील शेतीत २०११ पासून नवनवीन प्रयोग करायला सुरुवात केली़ त्यांची प्रयोगशील शेती पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी येत असतात़ परंतु गोळे यांच्या प्रयोगशीलतेची दखल घेत सेवागिरी ट्रस्टद्वारे पुसेगाव येथे झालेल्या कृषी प्रदर्शन २०१६ या ठिकाणी जिल्हा परिषद सातारा तर्फे देण्यात आलेल्या ‘श्री सेवागिरी शेतीनिष्ठ’ पुरस्कार २०१६ यामध्ये वाई तालुक्यातून जितेंद्र दिलीप गोळे (रा. गोळेगाव) यांना पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा, आमदार शशिकांत शिंदे, आ़ मोहनराव कदम, आ़ आनंदराव पाटील, डॉ़ सुरेश जाधव, जिल्हा परिषद कृषी सहायक डॉ. चांगदेव बागल यांच्या उपस्थित पुरस्कार प्रदान करण्यात आला़ वाईपासून २७ किलोमीटरवर क्षेत्र महाबळेश्वरच्या पायथ्याच्या दुर्गम भागात वसलेल्या गोळेगाव या खेड्यामध्ये २०११ या वर्षी गवतपड जमीन विकसित करून सुरुवातीस स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले़ त्याचबरोबर गेले दोन वर्षांपासून स्ट्रॉबेरी सोबत विदेशी भाजीपाला पिके घेण्यास सुरुवात केली़ त्यामध्ये ब्रोकली, चायनीज कोबी, आईसबर्ग, चेरी टोमॅटो, पार्सली, सेलेरी, लालकोबी, स्वीट कॉर्न अशा वेगवेगळ्या विदेशी पालेभाजी पिकांचे उत्पादन घेण्यात येत आहे़ त्याचबरोबर नेहमीच्या देशी भाजीपाल्याचे देखील उत्पादन घेत आहेत. यामध्ये लाल मुळा, सफेद मुळा, दुधी भोपळा, कारले, वांगी, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, फराशी अशा मुळवर्गीय व पालेभाज्या पिकांचे देखील उत्पादन घेतले जाते़ यामध्ये जितेंद्र गोळे यांना त्यांचे वडील दिलीप साहेबराव गोळे यांची प्रेरणा मिळाली़ तसेच यासाठी त्यांना वेळोवेळी महालक्ष्मी अॅग्रो सर्व्हिसेस वाई, प्रशांत पोळ व भरत देशमुख यांचे तसेच पंचायत समितीमधील कृषी अधिकारी ज्योत्स्रा बहिरट या सर्वांनी मोलाचे मार्गदर्शन केले़ (प्रतिनिधी)मी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करत आहे़ पश्चिम भागात नैसर्गिक वैविधता चांगली असल्याने कृषी पर्यटन करण्याचा मानस आहे़ यामुळे स्थानिकांना रोजगार ही उपलब्ध होईल़ युवकांनी नोकरीच्या मागे न लागता कोणत्याही क्षेत्रातील कौशल्य आत्मसात करून व्यवसाय करावा़ - जितेंद्र गोळे, गोळेगाव
कल्पकतेसह प्रयोगशीलतेने तरूणाने तांबड्या मातीत पिकवलं सोनं...!
By admin | Published: January 02, 2017 11:14 PM