सातारा : राज्य शासनाने यंदाच्या खरीप हंगामापासून एक रुपयात पीक विम्याचे संरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुदतीत जिल्ह्यातील तब्बल पावणे तीन लाख शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे. यामध्ये माण तालुका अग्रेसर असून ७५ हजार शेतकरी सहभागी झाले आहेत. दरम्यान, प्रथमच पीक विमा योजनेला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे.शेतकऱ्यांना शेती करताना विविध संकटांचा सामना करावा लागतो. यासाठी विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ आदी कारणाने पिकाचे नुकसान झाल्यास विमा उतरविलेल्या पिकांसाठी भरपाई देण्यात येते. यासाठी पूर्वी शेतकऱ्यांना ठरावीक रक्कम भरावी लागत होती. तर राज्य आणि केंद्र शासनाचाही वाटा असायचा. पण, राज्य शासनाने यंदाच्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना एक रुपयांत पीक विमा देण्याचा निर्णय घेतला. त्याची सध्या अंमलबजावणीही झाली आहे.सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही एक रुपया भरुन पिकाचा विमा उतरवता आला. यासाठी एकूण ९ पिकांचा समावेश होता. भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद आणि कांदा या पिकांसाठी विमा उतरविण्यात आला. त्यातच या पीक विमा भरण्याची मुदत ३१ जुलैपर्यंत होती. पण, नंतर ३ आॅगस्टपर्यंत मुदत वाढविण्यात आली. एक रुपया भरुनच शेतकऱ्यांना विमा उतरवावा लागत होता. त्यामुळे विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली. त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत २ लाख ७५ हजार ६६८ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. आतापर्यंतचा हा उच्चांक आहे.
पीक विमा भरण्याची मुदत संपली; सातारा जिल्ह्यातील 'इतक्या' शेतकऱ्यांनी भरला विमा
By नितीन काळेल | Published: August 04, 2023 5:59 PM