परळी : येथील ठोसेघर व परळी वन परिमंडळ कार्यालयात गुरुवारी पहाटे सव्वापाचच्या दरम्यान मोठा स्फोट झाला. दिवसभरात घेतलेल्या शोध मोहिमेनंतर हा स्फोट गावठी बॉम्बचा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शिकारीसाठी वापरण्यात येणारे गावठी बॉम्ब वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जप्त करुन कार्यालयात ठेवले होते. त्यातील बॉम्बचा स्फोट झाल्याचे समोर आले आहे. स्फोटामुळे कार्यालयातील दारे, खिडक्या लांब उडून पडल्या होत्या, तर धुराचे लोट कार्यालयातून येत होते.याबाबत अधिक माहिती अशी, परळी येथे परळी - ठोसेघर संयुक्त परिमंडल कार्यालय आहे. या कार्यालयात कोणीही अधिकारी, कर्मचारी निवासी नसतात. या ठिकाणी कार्यालयाच्या आतील बाजूस कपाटे, आग विझविण्याच्या मशिनरी, जप्त केलेल्या दुचाकी, कागदपत्रे, आदी साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. या कपाटामध्येच शिकारीसाठी वापरण्यात असलेले गावठी बॉम्ब ठेवण्यात आले होते. हे बॉम्ब अचानक फुटल्याने या बॉम्बचा स्फोट झाल्याची माहिती प्रथम दर्शनी डॉग स्कॉड व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.पहाटेच्या वेळी अचानक मोठ्या आवाजात स्फोट झाल्याने शेजारी असलेल्या कुटुंबीयांची भंबेरी उडाली. वन कार्यालयाच्या लगतच पाळीव जनावरे तसेच गवताच्या गंजी व रहिवासी लोक असल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तत्काळ या घटनेची कल्पना वन परिमंडल अधिकारी सोळंकी यांना कळविण्यात आली.ही घटना समजतात वनक्षेत्रपाल डॉ. निवृत्ती चव्हाण, सातारा तालुका पोलिस दलाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट घेऊन माहिती घेतली. दुपारी डॉग स्कॉड दाखल झाले. त्यांच्या छाननीमध्ये त्यांना दोन जिवंत गावठी शिकारीचे बॉम्ब आढळले. हे बॉम्ब त्यांनी पंचनामा करून त्याची सातारा येथे विल्हेवाट लावली.
परळी येथील वन परिमंडल कार्यालयामध्ये जप्त केलेल्या दुचाकी, जप्त केलेले गावठी बॉम्ब तसेच अन्य काही साहित्य का ठेवण्यात आले होते? जप्त केलेले बॉम्ब याची रेकॉर्डवर नोंद आहे का? त्याची नोंद असेल तर हे बॉम्ब निकामी का केले नाहीत? हे जप्त केलेले बॉम्ब अन्य कोणत्या कारणासाठी वापरण्यात येणार होते का ? असेही प्रश्न उपस्थित होत आहेत.