तळमावले : काळगाव (ता. पाटण) विभागात यंदा वळीवाच्या पावसाने म्हणावी तशी हजेरी लावली नाही. त्यामुळे पेरण्या लांबल्या होत्या. त्यातच तौक्ते चक्रीवादळाने तडाखा दिला. त्या वादळामुळे दोन-तीन दिवस मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर पाऊस गेल्याने शेतकऱ्यांनी युध्दपातळीवर भुईमूग, भात, सोयाबीन, मका आदी पिके पेरुन घेतली. सुमारे ८० टक्के पेरणी याकाळात पूर्ण झाली.
दोन-तीन दिवस पावसाने उघडीप दिल्याच्या काळात ही पेरणी झाली. त्यानंतर पुन्हा सलग चार ते पाच दिवस पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे पिके उगवण्यास पोषक असे वातावरण तयार झाले. सलग पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. मात्र, गत आठवड्यापासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शिवारात कोळपणीची एकच हातघाई उसळलेली दिसून येते. तसेच ज्यांची किरकोळ पेरणी राहून गेली आहे, त्यांनीदेखील ती पूर्ण करण्यासाठी गडबड सुरू केली आहे.
ग्रामीण भागात सुरुवातीच्या काळात डोक्याने ओढणारा कोळप्याचा वापर जास्त प्रमाणात कोळपणीसाठी केला जात असे. या कोळप्याला दोन माणसांची आवश्यकता भासत असे. एक कोळपा ओढण्यासाठी आणि दुसरा तो कोळपा पुढे दाबण्यासाठी. परंतु, सायकल कोळपा आल्यामुळे हे कोळपे हल्ली दिसेनासे झाले आहेत. सायकल कोळप्यामुळे एकच व्यक्ती पिकामध्ये कोळपू शकतो. त्यामुळे सर्वत्र सायकल कोळप्याने लोक पिके कोळपत असल्याचे दिसत आहे.
सध्या पिके कोळपण्यासाठी पोषक वातावरण आहे. आता कोळपल्यामुळे पुढे मोठ्या प्रमाणात येणाऱ्या तणाला प्रतिबंध घालता येतो. काळगाव विभागातील वाड्या-वस्त्यांवर सध्या कोळपणीची धांदल सुरु असल्याचे दिसून येत आहे.
- चौकट
भाताचे उत्पादन जास्त
काळगाव विभागात जास्त पाऊस असतो. त्यामुळे बहुतांशी शेतकरी भाताचे पीक घेतात. हे पीक करताना लावणीची पध्दत वापरली जाते. लावणीसाठी रोपे तयार करण्यासाठी बी टाकले जाते. त्यानंतर संबंधित वावरामध्ये नांगरले जाते. हे कामही सध्या सुरु आहे. लावणीच्या पध्दतीमुळे शेतातील तण कमी होतात तसेच पिकाचे उत्पादनदेखील जास्त येते.
- कोट
पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरी कामात व्यस्त आहेत. कोळपणीच्या माध्यमातून पिकातील जास्तीत जास्त तण काढण्यास मदत होत आहे. त्यामुळे भांगलणी करताना जास्त त्रास होत नाही. अजून एकदा कोळपणी झाली तर पीक चांगल्या पध्दतीने येण्यास मदत होईल.
- गयाबाई डाकवे
डाकेवाडी, ता. पाटण
फोटो : २८केआरडी०१
कॅप्शन : काळगाव (ता. पाटण) विभागातील शिवारामध्ये सध्या कोळपणीच्या कामाला वेग आला आहे. (छाया : पोपट माने)