कऱ्हाड : येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा निकाल जाहीर झाला असला तरी पेपर पुनर्तपासणीसाठीची मुदत संपल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. ‘लोकमत’ने सोमवारी विद्यार्थ्यांची ही फरपट उघडकीस आणल्यानंतर महाविद्यालय व्यवस्थापनाने विद्यापीठाशी संपर्क साधून मुदत वाढवून देण्याची विनंती केली. विद्यापीठानेही पेपर पुनर्तपासणीसाठी अर्ज भरण्याची मुदत वाढवून दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, दुसऱ्या सत्राचा परीक्षा फॉर्म भरण्यासाठीची मुदतही सध्या संपली असून, विद्यार्थ्यांना ‘लेट फी’ भरावी लागण्याची चिन्हे आहेत. याबाबत विद्यापीठाने अद्यापही निर्णय न दिल्याने विद्यार्थी कोंडीत सापडले आहेत. कऱ्हाडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सुमारे तेराशे विद्यार्थ्यांचा निकाल विद्यापीठाने राखून ठेवला होता. डिसेंबर महिन्यात प्रथम सत्राची परीक्षा संपल्यानंतर जानेवारीच्या २० तारखेपर्यंत विद्यापीठाने निकाल जाहीर करणे गरजेचे होते. मात्र, कऱ्हाडच्या महाविद्यालयाचे प्राध्यापक पेपर तपासणीसाठी आले नसल्याचे सांगून विद्यापीठाने तेराशे विद्यार्थ्यांचा निकाल अडवून ठेवला. इतर महाविद्यालयांचा निकाल मात्र १६ जानेवारीलाच जाहीर करण्यात आला. आठ दिवसांच्या निर्धारित मुदतीत संबंधित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी पेपर पुनर्तपासणी अर्ज भरून विद्यापीठाकडे सादर केला. तसेच दुसऱ्या सत्राचा परीक्षा फॉर्म भरण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली. मात्र, कऱ्हाडच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा निकालच जाहीर न झाल्याने शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले. ‘लोकमत’ने या प्रकाराचा वाचा फोडल्यानंतर विद्यापीठाने तातडीने कऱ्हाडच्या अभियांत्रिकीचा निकाल जाहीर केला. मुळात निकाल जाहीर करण्यास विद्यापीठाकडून उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना पेपर पुनर्तपासणीसाठी अर्ज करण्यास मुदत मिळाली नाही. याबाबत सोमवारी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महाविद्यालय व्यवस्थापनाने विद्यापीठाशी संपर्क साधून पेपर पुनर्तपासणीचा अर्ज करण्यास विद्यार्थ्यांना मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी केली. त्याला विद्यापीठाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. विद्यापीठाने पेपर पुनर्तपासणीचा अर्ज करण्यास विद्यार्थ्यांना दि. ७ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. मात्र, ‘लेट फी’चा प्रश्न अद्यापही निकाली निघालेलानाही. (प्रतिनिधी)... तर फॉर्म भरणार नसल्याचा इशारा- --अभियांत्रिकीच्या प्रथम, द्वितीय, तृतीय व अंतिम वर्षाचा निकाल जाहीर करण्यास विद्यापीठाकडून विलंब झाला. त्यामुळे आता विद्यार्थ्यांकडून ‘लेट फी’ घेणे चुकीचे आहे. विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी आम्ही केली आहे. जोपर्यंत मुदत वाढवून मिळत नाही, तोपर्यंत एकही विद्यार्थी दुसऱ्या सत्राचा परीक्षा फॉर्म भरणार नसल्याचा इशारा विद्यार्थी जनरल सेक्रेटरी मंगेश सुरुसे व पवन घोडस्कार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.
पेपर पुनर्तपासणीला विद्यापीठाकडून मुदतवाढ
By admin | Published: February 02, 2015 10:07 PM