लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : नवी दिल्ली येथील पंतप्रधानांचे राष्ट्रीय सल्लागार असल्याचे खोटे सांगत विविध शासकीय टेंडर मिळवून देतो म्हणून तिघांची तब्बल ८३ लाखांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एका महिलेसह दोघांना अटक केली.
कश्मिरा संदीप पवार (वय २८, रा. सदर बझार), गणेश हरिभाऊ गायकवाड (रा. शाहूनगर), अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सातारा शहर पोलिस ठाण्यात कश्मिरा पवार व गणेेश गायकवाड, या दोघांविरुध्द २०२३ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकणात सातारा शहर पोलिस ठाण्याच्या वतीने तक्रार देण्यात आली आहे. दोन्ही संशयित भारत सरकारच्या गृह विभागाचे, उत्तर प्रदेश राज्याचे टेंडरचे पत्र, लोकसभा सचिवालय येथे कपडे पुरवण्याचे टेंडरचे पत्र दाखवून ते टेंडर मिळवून देतो, असे सांगत होते. यातूनच गोरख मरळ (रा. सहकारनगर, पुणे) यांची ५० लाख रुपयांची, चंद्रशेखर पवार (रा. सातारा) यांची ७ लाख रुपयांची फसवणूक झाली. सातार्यातील फिलीप भांबळ यांची हॉटेल भाडे प्रकरणातून सुमारे २६ लाख रुपयांची फसवणूक झाली. अशाप्रकारे तिघांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ८३ लाख रुपये फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी बुधवारी या प्रकरणाची माहिती घेऊन प्रलंबित गुन्ह्यात या दोघांना तातडीने अटक केली. अशाप्रकारे काेणाची फसवणूक झाली असेल त्यांनी सातारा शहर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी केले आहे.