कऱ्हाड : उत्तर प्रदेशमधील सारंगपूर जिल्ह्यातील जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात लाखो रुपयांचे कमिशन मिळवून देतो, असे सांगून कऱ्हाड तालुक्यातील युवकांची तब्बल तीस लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बबन सहदेव मोरे (रा. द हिल पार्क को. ऑप. सोसायटी, जीवदानी रोड, हिलपार्क, वसई, ठाणे), आदित्य ठाकूर, राकेश अग्रवाल व अली अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत हजारमाची येथील विकास हिंदुराव काटकर यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हजारमाची येथील विकास काटकर व येणके येथील दत्तात्रय गरुड हे दोघे जण मित्र आहेत. दत्तात्रय यांना डिसेंबर २०२२ मध्ये आदित्य ठाकूर नावाच्या व्यक्तीने मोबाइलवर संपर्क साधून उत्तर प्रदेश येथील सारंगपूर जिल्ह्यातील सोनाअर्जुनपूर गावातील १.७२७ हेक्टर जमिनीची विक्री करायची असल्याचे सांगितले होते. तसेच, ही जमीन महाराष्ट्रातील बबन मोरे याच्या मालकीची असल्याचे सांगून त्यांना संपर्क करा, असे सांगितले. त्यानुसार विकास काटकर व दत्तात्रय गरुड या दोघांनी बबन मोरे याच्या मोबाइलवर संपर्क साधला. त्यावेळी हा व्यवहार जुळवून दिला तर मोठे कमिशन मिळेल, असे बबन मोरे याने सांगितले. त्यानुसार जमिनीचा व्यवहार करण्यासाठी विकास, दत्तात्रय व बबन मोरे हे तिघे जण १४ डिसेंबर २०२२ रोजी विमानाने देहरादून येथे गेले. त्या ठिकाणी त्यांची आदित्य ठाकूर याची भेट घेतली. तसेच, राकेश अग्रवाल नावाच्या व्यक्तीशी विकास व दत्तात्रय यांनी जमिनीचा व्यवहार केला. संबंधित जमिनीची विकास व दत्तात्रय यांच्या नावाने नोटरी करून देण्यासाठी ठाकूर व मोरे यांनी पैसे मागितले. त्यानंतर पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी विकास व दत्तात्रय कऱ्हाडला आले.कऱ्हाडात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या मित्रांकडून तसेच स्वत:जवळील पैसे एकत्र करून तीस लाख रुपये जमवले. हे सर्व पैसे त्यांनी आरोपींना दिले. मात्र, त्यानंतर नोटरी करून देण्याबाबत टाळाटाळ होऊ लागल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे विकास काटकर व दत्तात्रय गरुड यांच्या निदर्शनास आले. तसेच, आरोपींनी दिलेले धनादेशही बँकेत वटले नाहीत. त्यामुळे विकास काटकर यांनी याबाबत कऱ्हाड शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक मारुती सराटे तपास करीत आहेत.
व्हिडीओ कॉलवर झाला व्यवहार...पैशाची जमवाजमव केल्यानंतर विकास काटकर, दत्तात्रय गरुड, संग्राम पिसाळ व योगेश हे चौघे जण वसई-ठाणे येथे गेले. त्याठिकाणी त्यांनी बबन मोरे याला २६ लाख ७५ हजार रुपये दिले. हे पैसे घेताना बबन मोरे याने अली याला व्हिडीओ कॉल करून पैसे घेत असल्याचे दाखवले. तर, अली याने त्याच व्हिडीओ कॉलवर आदित्य ठाकूर याच्याकडे जमिनीची नोटरी देत असल्याचे दाखवले होते. त्यामुळे हा व्यवहार पूर्ण झाला असे कऱ्हाडातील युवकांना वाटले होते.