आॅनलाईन लोकमतकऱ्हाड (जि. सातारा), दि. १८ : महामार्गानजीकच्या दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले असताना तळबीड, तासवडे, वहागाव या गावांतील अवैध दारू व्यावसायीकांना सुगीचे दिवस आले आहेत. परिसरात दारुबरोबरच मटका, जुगार अड्डे चालत असून या व्यावसायीकांवर पोलिसांचा धाक राहिला नसल्याची परिस्थिती आहे. तळबीड पोलिसांच्या दुर्लक्षामुळे परिसरातील गावागावांतील सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.तळबीड पोलिस ठाण्याच्या तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव यांनी गत दोन वर्षांत अवैध व्यवसायावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरातील गुन्हेगारीचे प्रमाणही घटले होते. मात्र, गत काही महिन्यांपासून तळबीड पोलिसांच्या हद्दीतील तासवडे, शिरवडे, यशवंतनगर, वहागाव, घोणशी, तळबीड, बेलवडे हवेली आदी गावात अवैध व्यवसाय पुन्हा नव्याने सुरू झाले आहेत. अवैधपणे दारू विक्रीसाठी प्रत्येक गावात टोळी सक्रीय झाली आहे. परिसरातील या गावातील वाढत्या अवैध व्यवसायांमुळे गावांचे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे.पोलीस ठाण्याचा नव्याने पदभार स्विकारलेल्या अधिकाऱ्यांनी दोन महिन्यात हद्दीतील पोलिस पाटील, हॉटेल, लॉज व्यावसायिकांची बैठक घेतली होती. या बैठकीनंतर परिसरातील अवैध व्यवसायांना चाप बसेल, असे वाटले होते. मात्र, सर्वसामान्यांची ही अपेक्षा सपशेल फोल ठरली आहे. व्यवसाय कमी होण्याऐवजी वाढल्याचे दिसत आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अवैध व्यवसायीकांना पाठबळ मिळत असल्याचा आरोप ग्रामस्थांतून केला जात आहे.
महिलांसमोरही दारूबंदीचे आव्हान
वाढते अवैध धंदे सर्वसामान्यांना दिसतात. मग संबंधित प्रशासनाला का दिसत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या अवैध व्यावसायिकांवर नेमका कोणाचा वरदहस्त आहे, याचे कोडे सर्वसामान्यांनाही उलगडलेले नाही. एकेकाळी परवानाधारक दुकाने बंद पाडून दारुबंदीसाठी लढा देणाऱ्या महिलांपुढेही सध्या अवैध दारूविक्री आव्हान बनले आहे. काही पोलीस कर्मचारीच या अवैध व्यावसायीकांना पाठीशी घालत असल्याचा आरोप ग्रामस्थांतून केला जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे.