सातारा : शिक्षक सहकारी बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडीत माजी आमदार शिवाजीराव पाटीलप्रणीत संघाच्या उमेदवारांचा पराभव झाला. या निवडीवेळी संघातील काही पदाधिकाऱ्यांनी संघाची गद्दारी राज्य संपर्कप्रमुख सुनील सावंत, विद्यमान संचालक व जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार जाधव, तसेच खटाव तालुकाप्रमुख बंडोबा शिंदे यांची शिक्षक संघातून कायमस्वरूपी हकालपट्टी केल्याची घोषणा अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य नेते माजी आमदार शिवाजीराव पाटील यांनी केली.अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत पराभव झाल्यानंतर माजी आमदार शिवाजीराव पाटीलप्रणीत संघाची तत्काळ बैठक झाली. संघाचे नेते शिवाजीराव पाटील म्हणाले, ‘केवळ शिक्षक बँकेची सत्ता मिळविण्यासाठी संभाजीराव थोरात गटाने मनोमिलनाचे नाटक केले. मनोमिलन टिकवायचे नसल्यामुळे अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत आम्हाला विश्वासात घेतले गेले नाही. तर आमचेच संचालक फोडून संभाजीराव थोरात, सिद्धेश्वर पुस्तके यांनी कुटील राजकारण करण्याचा प्रयत्न केला.’राज्य कोषाध्यक्ष तुकाराम कदम यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, बँक संचालक ज्ञानेश्वर कांबळे, महेंद्र अवघडे, निर्मला बसागरे, प्रदीप घाडगे, सोसायटीचे चेअरमन संजय शेजवळ, संतोष मासाळ, पृथ्वीराज गायकवाड, हणमंतराव माने, विलास घोलप, शदर बेस्के उपस्थित होते. (प्रतिनिधी) नियमबाह्य सदस्य निवडीला विरोध आम्ही पराभव स्वीकारला असून यापुढे सभासदांच्या न्याय, हक्कासाठी लढणार आहे. संघातील मनोमिलन आता संपुष्टात आले असून जिल्हा परिषदेच्या शिक्षण, क्रीडा समितीवरील निमंत्रित सदस्य नियुक्तीला आमचा विरोध राहील. कशाच्या आधारे ही नियुक्ती केली आहे, याचा जाब दोन दिवसांत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विचारून नियमबाह्य सदस्य निवडीला विरोध करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
तीन पदाधिकाऱ्यांची शिक्षक संघातून हकालपट्टी
By admin | Published: July 05, 2015 9:49 PM