सातारा : जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून थंडीचा मुक्काम असून शुक्रवारी तर साताऱ्यात १४.२ आणि महाबळेश्वरला १०.५ अंश किमान तापमानाची नोंद झाली होती. यामुळे गारठा कायम असल्याने शेती कामांसह बाजारपेठेवरही परिणाम झाला आहे.जिल्ह्यातील पारा मागील आठ दिवसांपासून घसरला आहे. यामुळे थंडीची तीव्रता वाढत चालली आहे. सायंकाळी सातनंतर थंडीला सुरुवात होते. तर पहाटेच्या सुमारास कडाका पडत आहे. यामुळे शहरातील बाजारपेठेसह ग्रामीण भागातील शेती कामावर चांगलाच परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.सातारा शहराचे किमान तापमानही गेल्या आठ दिवसांत १६ अंशावरुन कमी-कमी होत गेले. रविवारी तर १३.०६ अंश तापमान नोंद झाले होते. पण, सोमवारी तापमान वाढून १४.०९ अंशावर पोहोचले. पण, त्यानंतर तापमानात उतार आला. शुक्रवारी तर १४.२ अंश तापमानाची नोंद झाली.त्यातच शीतलहर असल्याने गारठा चांगलाच जाणवत आहे. यामुळे सकाळी ११ पर्यंत हवेत गारठा राहत आहे. यामुळे नागरिकांना ऊबदार कपडे घालूनच घराबाहेर पडावे लागत आहे. तर सकाळच्या सुमारास फिरणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे.महाबळेश्वरचा पाराही घसरला आहे. मागील चार दिवसांपूर्वी सलग दोन दिवस पारा १० अंशाच्या खाली राहिला. तर मंगळवारी या वर्षातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. त्यावेळी महाबळेश्वरला ८.८ अंश इतके तापमान नोंद झाले होते. यामुळे महाबळेश्वरसह परिसरातील गारठ्यात वाढ झाली आहे.
सातारा शहरातील नोंद किमान तापमान...२० जानेवारी १६.०१,२१ जानेवारी १५.०६,२२ जानेवारी १४.०२,२३ जानेवारी १३.०६,२४ जानेवारी १४.०९,२५ जानेवारी १४,२६ जानेवारी १३.०६,२७ जानेवारी १४.०७२८ जानेवारी १४.०२