सातारा : नियोजन भवनात सोमवारी होणाऱ्या बैठकीत वाढीव आराखड्याला कडाडून विरोध करण्याचा कानमंत्र रविवारच्या बैठकीत सदस्यांना देण्यात आला असून, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांच्या निवासस्थानी जोरदार खलबते झाली. त्यामुळे आजच्या सभेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.कामांची यादी सदस्यांना न विचारात घेता तयार केल्याने आमदारांसह सदस्यांनी विरोध केल्याने वाढीव आराखडा गेल्यावेळी झालेल्या नियोजन मंडळाच्या सभेत नामंजूर करण्यात आला होता. त्यामुळे पालकमंत्री विजय शिवतारे यांना सभा स्थगित ठेवावी लागली होती. पुन्हा त्याच विषयासाठी नियोजन सभा सोमवारी होणार आहे. या सभेत पालकमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचे कानमंत्र विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि माजी पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी नियोजन समितीच्या सदस्यांना दिले आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांच्या निवासस्थानी ही बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार दीपक चव्हाण, आ. प्रभाकर घार्गे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, सतीश धुमाळ, संगीता चव्हाण, विजयमाला जगदाळे, कविता म्हेत्रे, जितेंद्र सावंत, संदीप शिंदे, समाजकल्याण सभापती मानसिंगराव माळवे, सुनंदा राऊत, कवितागिरी, सुभाष नरळे, सुरेश सपकाळ, सदाशिव जाधव आदी उपस्थित होते.गेल्यावेळी झालेल्या नियोजन समितीच्या सभेत २१८ कोटींच्या वाढीव आराखड्याला नामंजुरी देण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आणि सदस्यांनी केलेल्या विरोधामुळे आली होती. पालकमंत्री शिवतारे यांनी मला तारीख मिळाल्यानंतर नियोजनाची सभा घ्या, अशी सूचना केली होती. मात्र, या बैठकीनंतर एकदा तारीख ठरूनही सभा पुढे ढकलण्यात आली. परंतु आता ११ जानेवारीची सभेची तारीख निश्चित करण्यात आली. त्या अगोदरच सभेतील व्यूहवरचना कशी असावी, या पार्श्वभूमीवर माजी पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी शनिवारी ही बैठक आयोजित केली होती.प्रस्तावित आराखडा हा ४,४४९ कोटींचा असून, केवळ १४५ कोटींचाच आराखडा सभेत ठेवला आहे. त्यामध्येही पालकमंत्री आणि बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी ४४ कोटींच्या कामे घुसवली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळे आजच्या सभेत सदस्यांकडून कडाडून विरोध होणार असल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)
वाढीव आराखड्याला होणार तीव्र विरोध !
By admin | Published: January 10, 2016 10:42 PM