लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर क्रांतीसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालय कोरोनाबाधित रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो ज्येष्ठांसमोर अंधार पसरल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे मार्च महिन्यापासून जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया रखडल्या आहेत.
उतारवयात ज्येष्ठांवर लेन्स बसवणं, मोतिबिंदू आणि काचबिंदू यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्ह्यात मोठी रांग असते. खासगी दवाखान्यांमध्ये शस्त्रक्रियेचे उच्च दर असल्याने बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या अनेक कुटुंबांनी जिल्हा रुग्णालयाचा आसरा घेतला. सातारा जिल्ह्यात सातारा, कऱ्हाड आणि फलटण या तीन ठिकाणी शस्त्रक्रिया केल्या जातात. रुग्णालयाच्या नेत्र विभागात पूर्वी एका महिन्यात अडीचशेच्या सुमारास शस्त्रक्रिया होत होत्या. मात्र, कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या सातारा जिल्ह्यात गेल्या मार्चपासून हजारो शस्त्रक्रिया रखडून पडल्या आहेत. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर शस्त्रक्रिया सुरू होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, दुसरी लाट अधिक तीव्र झाल्यामुळे मार्च मध्यात शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्या आहेत. कोरोनाची स्थिती नियंत्रणात आल्यानंतर शस्त्रक्रिया सुरू होतील, असा विश्वास आहे. मात्र तोवर अनेकांनी खासगीत उपचार घेऊन शस्त्रक्रिया केल्याचं समोर आलं आहे.
कोरोनाची पहिली लाट कमी झाल्यानंतर अनेक रुग्णांनी शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात संपर्क केला होता. नेत्ररोग विभाग पूर्ववत सुरू करण्याचा विचार सुरू असतानाच कोविडच्या दुसऱ्या लाटेने सर्व आरोग्य यंत्रणाच हादरवून टाकली. कोरोनाची ही दुसरी लाट कमी झाल्यानंतरच नॉनकोविड विभाग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली.
पॉइंटर
शासकीय रुग्णालयात कोरोनाआधी महिन्याला होणाऱ्या नेत्र शस्त्रक्रिया : २५०
गेल्या वर्षभरातील नेत्र शस्त्रक्रिया : ७८५
कोट :
सातारा जिल्ह्यात महिन्याला २५० ते ३०० शस्त्रक्रिया होतात. गतवर्षी कोविडमुळे रुग्णांवर उपचार करायला लॉकडाऊनमुळेही अडथळे आले. पण जेवढे रुग्ण पोहोचले त्या सर्वांची योग्य काळजी घेऊन उपचार करण्यात आले. १५ मार्चअखेर आवश्यक शस्त्रक्रिया पूर्ण केल्या.
- डॉ. चंद्रकांत काटकर, नेत्र शल्य चिकित्सक
अंधार कधी दूर होणार?
वयोमानाने उद्भवणाऱ्या मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करण्यासाठी आम्ही डॉक्टरांची वेळ घेतली. शस्त्रक्रियापूर्व आवश्यक औषधोपचारही घेण्यात आले मात्र कोविड प्रादुर्भाव वाढल्याने शस्त्रक्रिया पुढं ढकलावी लागली.
- कैलास आटपाडकर, सातारा
कोविडच्या लाटा ओसरण्याचं नाव घेईनात म्हणून मग आम्ही नाइलाजाने खासगीत शस्त्रक्रिया करून घेतली. यासाठी कर्ज काढावे लागले; पण ते केलं नसतं तर दुखणं बळावत जाऊन डोळे काढण्याची वेळ आली असती.
- सारिका पवार, सातारा
कोविडच्या काळातच डोळ्याचं दुखणं बळावलं. रमजान महिना संपेपर्यंत जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया करणं शक्य असेल तर ठीक नाहीतर तात्पुरती औषधे आणून शस्त्रक्रिया पुढं ढकलावी लागणार.
- अंजूमन पठाण, सातारा