म्हसवड : माण विधानसभा मतदारसंघातील लढत आता भलतीच रंगतदार बनत चालली आहे. प्रत्येक इच्छूक उमेदवारांनी आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात टीका करण्याचा सपाटा लावला आहे. माजी आ. सदाशिवराव पोळ, जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई, हरणाई सूतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष रणजितसिंह देशमुख व पंचायत समिती सदस्य शेखर गोरे यांनी शड्डू ठोकला आहे. मात्र, असे असलेतरी महायुतीकडून नेमकी कोणाला संधी मिळणार यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. महायुतीचा उमेदवार निश्चित आहे, मात्र तो कोणत्या पक्षाचा असेल आणि हा मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे जाईल, याविषयी अजूनही ठामपणे सांगता येत नाही. दुष्काळी माण व खटाव तालुक्यांच्या निवडणुका आजवर पाणीप्रश्नांवर लढविल्या गेल्या व जिंकल्या. दुष्काळी जनतेला निवडणुकीत पाणीप्रश्न आपणच सोडविणार, अशी आश्वासने देऊन निवडणुकीत पाणी प्रश्नाचा मुद्दा उपस्थित करून जनतेला खोटी आश्वासने देऊन निवडणूक जिंकायची. निवडणुका झाल्या की पुढील निवडणुकांपर्यंत पाणीप्रश्नाचा मुद्दा आडगळीत टाकायचा हा आजवरचा इतिहास. प्रत्यक्षात निवडणुकीत दिलेला पाणीप्रश्न सोडविण्याचा शब्द विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांनी उरमोडी योजनेचे पाणी माणच्या अंगणी आणले. नुकताच किरकसाल येथे मुख्यमंत्र्यांनी उरमोडीच्या पाण्याचे जलपूजन केले. गोरे यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात १४७५ कोटींची विविध विकासकामे मतदारसंघात केल्याचे सांगितले जात आहे.माजी आमदार सदाशिवराव पोळ यांनी आजवर आपल्या ४५ वर्षांच्या राजकीय वाटचालीत तालुक्यात केलेली विकासकामे सर्वसामान्य जनतेत मिसळून जनसामान्यावर त्यांची असलेली पक्कड, शांत, संयमी नेतृत्व ‘अब की बार तात्या आमदार’ हा नारा त्यांच्या कार्यकर्त्यांनी देऊन विधानसभा कुठल्याही परिस्थितीत जिंकायची, यासाठी तात्यांचे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते कामाला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव विसरून जोमाने कार्यकर्ते कामाला लागले आहेत. निवडणुकीत वापरावी लागणारी सर्व आयुधे वापरण्यास सुरुवात केली आहे. हरणाई सूतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष उद्योजक रणजितसिंह देशमुख यांनी खटाव व माण तालुक्यांत औद्योगिक क्रांतीस सुरुवात करून पिंगळी येथे सूतगिरणीचे नुकतेच उद्घाटन केले. त्यामुळे बेरोजगारांच्या हाताला तालुक्यातच काम मिळाल्याने त्यांना प्रत्येक गावात कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडे युवकांचा ओढा वाढला आहे.आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान, धनगर समाजाचा मेळावा, बेरोजगारीसाठी नोकरी मेळावा घेऊन जनसंपर्क वाढवला आहे. हरणाई सूतगिरणीच्या मशिनरी पूजन माण तालुक्यातील प्रत्येक गावात केल्याने व प्रत्यक्षात सूतगिरणी सुरू झाल्याने त्यांच्याकडे आश्वासक नजरेने माणीच जनता पाहात आहे.जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई यांनी माण व खटाव तालुक्यांत मेळावे, बैठका, भूमिपूजन, उद्घाटने असे कार्यक्रम घेऊन जनसंपर्क वाढविला असून, आजवर १५ वर्षांच्या राजकीय वाटचालीत केलेली कामे, शालेय विद्यार्थ्यांना संगणक वाटप, कृषी प्रदर्शन घेऊन शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती करून दिली. त्यांनी केलेली विकासकामे यापुढे तालुक्यासाठी काय करणार? ही भूमिका सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यात ते प्रयत्नशील आहेत.पंचायत समिती सदस्य शेखर गोरे यांनी माण-खटाव तालुक्यातील युवक वर्ग संघटित केला आहे. त्यांनी आंधळी गणात केलेली स्वखर्चाने विकासकामे त्याचबरोबर दुष्काळी परिस्थितीत जनतेसाठी पिण्यासाठी पाण्याची टँकरची सोय, रुग्णांसाठी रुग्णवाहिका, पिकअप शेड दुरुस्ती, स्वागत कमानी आदी कामे आंधळी गणात केली. त्यांना सातारा जिल्ह्यात आंधळी, गण जसा रोल मॉडेल केला तसा माण विधानसभा मतदारसंघ रोल मॉडेल बनवायचा आहे. सध्या त्यांची पत्नी सोनल गोरे व बहीण सुरेखा पखाले यांनी भावनिक साद घालत माण व खटाव तालुक्यांतील महिला संघटित करून हळदी-कुंकू समारंभ कार्यक्रम घेऊन हजारो महिलांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरत आहे.शिवसेनेने मतदारसंघ आमचाच असल्याने या मतदारसंघातून धनाजी सावंत निवडणूक लढविणार असल्याने त्यांनी नुकताच मेळावा घेऊन शिवसैनिक चार्ज करण्यात यशस्वी झाले आहे. युती शासनाच्या काळात माण व खटावचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी उरमोडी धरणाची निर्मिती करण्यात आली. दुष्काळी प्रश्न शिवसेनाच सोडवू शकते, असा त्यांचा दावा आहे. (प्रतिनिधी)लढत बहुरंगीच होणारमाण विधानसभा मतदारसंघाचे अंतिम चित्र स्पष्ट झाले नसलेतरी येथील सत्तासंघर्ष मात्र अगदी शिगेला पोहोचला आहे. काही दिवसांतच आघाडी आणि महायुतीचे चित्र स्पष्ट होईल, त्यानंतर खऱ्याअर्थाने रंगत वाढणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी सोडली तर महायुतीमध्ये ही जागा कोणत्या पक्षाला जाणार याचेही निश्चित नाही.
चेहरे समोर..चिन्ह अंधारात !
By admin | Published: September 09, 2014 10:52 PM