जगात कुटुंबव्यवस्था ही समाजातील मूळ घटक संस्था मानली जाते. भारतासारख्या देशात तर कुटुंबसंस्था आणि विवाहसंस्थेला अत्यंत महत्त्व आहे. औद्योगिकीकरण आणि शहरीकरणानंतर अनेक आर्थिक, सांस्कृतिक व सामाजिक बदल होत गेले. त्याचा परिणाम हा कुटुंब आणि विवाह या दोन्हीही संस्थांवर झाला. यामध्ये विवाह संस्थेवर अधिक करून परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात आली. पती, पत्नी आणि मुले असे छोटे व सुटसुटीत कुटुंब दिसू लागले. महिलांची नोकरीची क्षेत्रे विस्तारली. तसेच आर्थिक आवकही वाढली. त्यातच करिअर आणि आर्थिक स्थिरतेला महत्त्व देण्यात येऊ लागले. यामुळे कुटुंबातील बंदिस्तपणा आणि प्रेमाचे बंधन उसवल्यासारखे झाले. त्यातूनच सध्या लग्न न करता एकत्र राहणाऱ्या तरुण-तरुणींचे प्रमाण वाढत चालले आहे. यातून कुटुंबसंस्थेला कुठेतरी धक्का लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच ही गोष्ट आजही समाजमान्य नाही. यातून अनेक चुकीच्या गोष्टीही घडू पाहत आहेत.
‘लिव्ह इन’मध्ये एक स्पष्ट आहे की, वरवर एकत्र असणाऱ्या दोन व्यक्ती केवळ तडजोड म्हणूनच एकत्र राहत असल्याचे दिसत आहे. कुटुंबव्यवस्थेतील हे बदल शहराबरोबर कदाचित हळूहळू ग्रामीण भागातही पसरतील. आणखी काही वर्षांनी समाजमन कसे व कोठे वळेल हे आजतरी सांगणे अवघड आहे. आज अमान्य असणारी ही बाब उद्या समाजमान्य होईलही. त्यातून कोणत्या प्रकारची कुटुंबव्यवस्था दिसेल याचे उत्तर आतातरी सांगणे अवघड आहे. पण, एक वास्तव आजही आहे की, बहुतांशी लोकांना ‘लिव्ह इन’ मान्यच नाही.
चौकट :
कुटुंबसंस्था म्हणजे काय?
विवाह, रक्तसंबंध किंवा दत्तकविधान आणि एकत्र निवास यांनी बांधल्या गेलेल्या दोन अथवा अधिक महिला आणि पुरुषांचा गट म्हणजे कुटुंब होय. कुटुंब हे एका व्यापक समाजरचनेचा भाग आहे. जुन्या कुटुंबांना ‘लिव्ह इन’ अजिबात मान्य नाही. तसेच ते यावर चर्चाही करताना टाळतात. शहरी भागात हे हळूहळू मोठ्या प्रमाणात रुजू लागलं आहे, हेही एक वास्तव आहे.
- नितीन काळेल
..............................................................