वडूज : गेल्या गाळप हंगामातील उर्वरित दोनशे रुपये आणि चालू गाळप हंगामातील एकरकमी एफआरपीची पहिली उचल जाहीर केल्याशिवाय आम्ही कारखाने सरळ चालू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. पेडगाव (ता. खटाव) येथे संघटनेच्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ऊसदराच्या आंदोलनाचे रणशिंग फुंकले.दोन-तीन दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी गोपूज ग्रीन पावर शुगर, पडळ येथील खटाव- माण शुगर आणि वर्धनी शुगर या कारखान्याच्या व्यवस्थापनाला आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. मात्र कुणीही पहिल्या उचलीची घोषणा केली नाही, त्यामुळे संघटना संतप्त झाली आहे. आता संघर्ष अटळ असल्याचे युवा जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख यांनी म्हटले आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार म्हणाले, ‘जिल्ह्यातील इतर कारखाने तीन हजारांच्या आसपास दर देत असताना खटावमध्ये मात्र हा दर २५०० रुपयांच्या आसपास रेंगाळला आहे. तालुकाध्यक्ष दत्तू काका घार्गे यांनी ऊस हंगाम संपल्या नंतर १२० दिवसांत सर्व हिशोब साखर आयुक्तालयास सादर करणे या कायद्याने बंधनकारक आहे. मात्र याबाबतही कारखान्यांनी कुठलीही हालचाल केली नसल्याची माहिती दिली.स्वाभिमानी शेतकरी संघटना खटाव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ शकते याची जाणीव झाल्यामुळेच संघटनेमध्ये प्रवेश करत असल्याचे राजू फडतरे यांनी यावेळी स्पष्ट केले. या वेळेला पेडगावमधील दहा ते पंधरा युवकांनी संघटनेमध्ये प्रवेश करून उत्पादकांच्या या लढ्याला बळ देण्याचे जाहीर केले.
सातारा: ..त्याशिवाय कारखाने चालू देणार नाही, खटावमध्ये स्वाभिमानीने आंदोलनाचे फुंकले रणशिंग
By प्रशांत कोळी | Published: October 28, 2022 4:44 PM