सातारा : ऊस गळिताचा हंगाम धीम्या गतीने सुरू असल्याने, अजून दोन महिने म्हणजे मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गळीत चालणार आहे. अद्याप मोठ्या प्रमाणात ऊस गाळपाविना उभा आहे. तोेडणी वाहतूक यंत्रणा विस्कळीत असल्याने कारखान्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जागेचे सपाटीकरण
सातारा : शाहूपुरीतील चोरगेमाळ परिसरात असणाऱ्या सात एकर जागेचे पालिकेच्यावतीने सपाटीकरण हाती घेण्यात आले आहे. या जागेवर शाहूपुरी व परिसरातील नागरिकांसाठी क्रीडा संकुल उभारण्याचा प्रस्ताव पालिकेच्या विचाराधीन आहे. याबाबतचा अंतिम निर्णय खासदार उदयनराजे भोसले घेणार असून यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया सध्या सुरू आहे.
एसटीला फटका
सातारा : जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भीतीपोटी सातारकरांनी एसटी प्रवास कमी केला असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सध्या विविध मार्गावर धावणाऱ्या एसटी बसेसच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला आहे. तसेच लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणाऱ्या बसेसच्या फेऱ्याही कमी केल्या आहेत.
खुदाईने रस्त्यांची वाट
सातारा : शहरातील ठिकठिकाणी पाणी गळती, नवीन नळ कनेक्शन, इंटरनेट वायरिंगसाठी खोदकामे सुरू असल्याने रस्त्यांची वाट लागत असून, वाहनधारकांची गैरसोय होत आहे. शहरातील राजपथ, शाहू चौक, देवी चौक परिसरात पाणी गळतीसाठी ठिकठिकाणी खोदकाम सुरू आहे.
बागेवाडी शाळेचे यश
आसू : जागतिक महिला दिनानिमित्त फलटण येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या बागेवाडी (ता. फलटण) येथील प्राथमिक शाळेच्या तीन विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. बागेवाडी येथील जय हनुमान तालीम मंडळात या विद्यार्थ्यांनी सराव केला. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
कोरेगाव शिक्षक समितीतर्फे सत्कार
कोरेगाव : कोरेगाव तालुका शिक्षक समितीच्यावतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कोरेगाव तालुक्यातील महिला शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये रणदुल्लाबादच्या सरपंचपदी निवड झाल्याबद्दल सपना ढमाळ, संगीता बर्गे, चित्रा खराडे यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी तालुका महिला आघाडीचे काम कौतुकास्पद असल्याचे मत किरण यादव यांनी व्यक्त केले.
वानरांचा उपद्रव
सातारा : कास-बामणोली, पेट्री या परिसरामध्ये वानरांच्या टोळीचा उपद्रव वाढल्याने नागरिक त्रस्त बनले आहेत. या परिसरात वानरांच्या टोळीने धुडगूस घातला असून, शेतातील पिकांसह घरांचे नुकसान होत आहे. शेतातील उन्हाळी भुईमूग, गहू, हरभरा या पिकांची वानरे नासधूस करत आहेत.
दुरुस्तीची मागणी
सातारा : आनेवाडी टोलनाका ते उडतारे या हद्दीतील सेवारस्ता पूर्णत: खचून गेला आहे. त्यामुळे हा सेवारस्ता वाहतुकीसाठी गेल्या काही महिन्यांपासून बंद ठेवण्यात आला आहे. तरीही अनेक वाहनचालक सर्कस करत खचलेल्या सेवा रस्त्याच्या कडेने वाट काढून प्रवास करत आहेत.
एटीएम मशीन बंद
सातारा : शहरातील महाविद्यालय परिसरातील काही एटीएम वारंवार बंद राहत असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. एक वर्षानंतर महाविद्यालये सुरू झाली असून, परीक्षा फाॅर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांची वर्दळ वाढली आहे. तसेच विद्यार्थ्यांना पैसे काढण्यासाठी बँकेत जाण्यापेक्षा जवळच्या एटीएममध्ये जाणे सोपे आहे.
रस्त्यावर गटारगंगा
सातारा : नगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गोडोली साईबाबा मंदिर ते अण्णासाहेब कल्याणी विद्यालय रोडवर भद्रकाली दुकानासमोर गटारीचे पाणी रस्त्यावर येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. हे दुखणे वर्षानुवर्षे कायम असून, स्थानिक वैतागले आहेत.
आग आटोक्यात
कोरेगाव : कोरेगाव-सातारा महामार्गावर रेल्वे स्टेशनसमोर लागलेली भीषण आग रहिमतपूर नगरपालिका व जरंडेश्वर शुगर मिलच्या अग्निशामक दलामुळे आटोक्यात आली. वाळके गवत व तेलकट सागवानच्या पानांना लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनीही पळ काढला.