सातारा : जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील ऊसदराची बैठक निष्फळ ठरल्यानंतर जिल्ह्यातील आणखी दोन साखर कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केली आहे. पण, शेतकरी संघटनांच्या मागणीनुसार ३ हजार ५०० रुपयांपेक्षा हा दर कमी आहे. त्यामुळे शेतकरी संघटनांचा ऊसदराचा लढा तीव्र होण्याचे संकेत आहेत. तसेच संघटनांनी गनिमी काव्याचा इशारा दिल्याने कारखान्यांचा हंगाम सुरळीत होणार का ? याविषयीही प्रश्न निर्माण झालेला आहे.
जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढत चालले आहे. यावर्षी एक लाख हेक्टरहून अधिक ऊस गाळपास येण्याचा अंदाज आहे. त्यातच जिल्ह्यात खासगी आणि सहकारी मिळून १५ हून अधिक साखर कारखाने असून बहुतांशी सुरू झाले आहेत. पण, दराचा तिढा कायम आहे. काही कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केली असलीतरी शेतकरी संघटनांना मान्य नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी गुरुवारीच नियोजन भवनात साखर कारखानदार प्रतिनिधी, शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. पण, यामध्ये कारखानदारांकडून पहिला हप्ता ३१०० रुपये देण्याचे जाहीर करण्यात आले. यावर शेतकरी संघटना पदाधिकाऱ्यांचे समाधान झालेले नाही. त्यांनी पहिली उचल ३ हजार ५०० रुपये आणि गेल्यावर्षी तुटलेल्या उसाला पैशाची मागणी केली आहे. पण, कारखाना प्रतिनिधींनी दुर्लक्ष केले. यामुळे ऊसदराची बैठक निष्फळ ठरली. तर या बैठकीनंतर जिल्ह्यातील दोन सहकारी साखर कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केली. तीही शेतकरी संघटनांच्या मागणीच्या कमीच आहे.
जावळीतील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याने २ हजार ८५० रुपये तर कऱ्हाड तालुक्यातील सह्याद्री साखर कारखान्याने ३ हजार १०० दर जाहीर केला. प्रतापगडचा दर कमी असलातरी सह्याद्रीने ऊसदर कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही शेतकरी संघटना सह्याद्री कारखान्याच्या दराला राजी होणार का ? हा प्रश्न आहे. कारण, जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत सर्वच शेतकरी संघटनांनी आक्रमकपणे ३ हजार ५०० ची पहिली उचल मागितली आहे. त्यामुळे शेतकरी संघटना आता काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलेले आहे.
साखर कारखानदार पहिला हप्ता जाहीर करत आहेत. पण, शेतकरी अडचणीत असताना साखर कारखानदार पाठिशी राहतील असे वाटत होते. मात्र, कमी दर देऊन शेतकऱ्यांना तुडविण्याचे काम त्यांच्याकडून होत आहे. काही कारखान्यांनी जाहीर केलेला दर आम्हाला मान्य नाही. पहिला हप्ता ३ हजार ५०० रुपये द्यावा अशी मागणी केली आहे. तरीही कारखानदार दोन पावले पुढे आलेतर आम्हीही दोन पावले मागे येऊ. आता ऊसदरासाठी निकराची लढाई सुरू करणार आहे.- राजू शेळके, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना